नवी मुंबईतील घरभाड्यात अनियंत्रित वाढ
By Admin | Updated: November 10, 2014 00:31 IST2014-11-10T00:31:05+5:302014-11-10T00:31:05+5:30
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणे स्वप्नवत होवून बसले आहे.

नवी मुंबईतील घरभाड्यात अनियंत्रित वाढ
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणे स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढल्याने मागील काही वर्षांत घरभाडेही गगनाला भिडले आहे. यातच शहरातील छोट्या गुंतवणूकदारांनी आता थेट रेंट इंडस्ट्रीत शिरकाव केल्याने मागील वर्षभरापासून घरांच्या भाड्यात अनियंत्रित वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सध्या सर्वाधिक भाडे वाशी विभागात आकारले जाते. येथे वन रूम किचनसाठी लोकेशननुसार सहा ते सात हजार रुपये आकारले जातात. वर्षभरापूर्वी हे दर दोन ते तीन हजार रुपये इतके होते. वन बीचएकेसाठी वाशीत बारा ते पंधरा हजार रुपये भाडे आकारले जाते. तर टू बीएचकेसाठी हा दर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये इतका आहे.
मागील वर्षभरात या घरांच्या भाडेदरात सरासरी चार हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अकरा महिन्यांचा करार असतो. प्रत्येक अकरा महिन्यांनंतर साधारण दहा ते पंधरा टक्के भाडेवाढ करण्याचा अलिखित करार असतो. असे असतानाही या नियमाला फाटा देत घरभाड्यात मनमानी पध्दतीने वाढ केली जात असल्याचे आढळून आले आहे.