बेशिस्त वाहनचालक वाढले
By Admin | Updated: January 17, 2015 01:31 IST2015-01-17T01:31:49+5:302015-01-17T01:31:49+5:30
सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

बेशिस्त वाहनचालक वाढले
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईमध्येही वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षभरात तब्बल ३,४७,८३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून तब्बल ३ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक पार्किंग व हेल्मेटच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नवी मुंबईची रचना करताना या ठिकाणी प्रशस्त रस्ते तयार केले आहेत. पार्किंगसाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु यानंतरही वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. नियम तोडणाऱ्यांवर वर्षभर करण्यात आलेल्या कारवाईमधून ३ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम वाहतूक विभागाकडे जमा झालेली आहे. दंडाची ही रक्कम सन २०१३ च्या तुलनेत १८ लाख ३३ हजार ८०० रुपयांनी अधिक आहे. तसेच सन २०१३ च्या तुलतेन गतवर्षी २० हजार ३४७ अधिक कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, बिगर लायसन्स वाहन चालवणे, बेशिस्त रिक्षा-टॅक्सी यांच्यावर कारवाई, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे अशा कारवायांचा त्यात समावेश आहे. वाहन चालकांमध्ये शिस्त आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम होतात.
हेल्मेटविषयी मोटारसायकलस्वारांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षभरात ४६ हजार ९२९ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईचा हा आकडा सन २०१३ च्या तुलनेत ९ हजार ६३ ने अधिक आहे. रहदारीच्या रस्त्यालगत अथवा नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांचीही संख्या शहरात तितकीच आहे. त्यानुसार नो पार्किंगमधील ७३ हजार ५८१ वाहनांवर गतवर्षी कारवाई झालेली आहे. सन २०१३ च्या तुलनेत २ हजार ४८३ ने कारवाईचा हा आकडा अधिक आहे. रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिक, प्रवाशांना नाहक त्रास होतो.