पुतण्याने केली काकाची हत्या
By Admin | Updated: October 6, 2014 03:30 IST2014-10-06T03:30:11+5:302014-10-06T03:30:11+5:30
येथील गंजाड गावातील घरकुलाच्या जागेवरून वाद निर्माण होऊन काका व पुतण्यात कडाक्याच्या भांडणानंतर पुतण्याने कोयत्याने सपासप वार केले

पुतण्याने केली काकाची हत्या
डहाणू: येथील गंजाड गावातील घरकुलाच्या जागेवरून वाद निर्माण होऊन काका व पुतण्यात कडाक्याच्या भांडणानंतर पुतण्याने कोयत्याने सपासप वार केले. काकाला जीवे ठार मारल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीस डहाणू पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली आहे.
चिंत्या तुल्या सावरा (५५) रा. गंजाड दसरापाडा यांचे इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. सदर घरकुलाचे बांधकाम तो घरासमोरील पडीत जागेवर करणार होता. परंतु चिंत्याचा पुतण्या आरोपी पांडू चैत्या सावरा याचा त्याला विरोध असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून दोघा काका-पुतण्याचे भांडण होत होते.
दरम्यान दसऱ्याच्या दिवशी चिंत्या आपल्या जावया सोबत रात्रीच्या सुमारास गप्पा मारत असताना आरोपी पांडू सावरा तिथे आला. त्यांनी काकाला पुन्हा त्या जागेवर घरकूल बांधू नको असे सांगितल्याने दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी पांडू यांनी घरातून कोयता आणून त्याचे काका चिंत्या सावरा यास डोक्यावर तसेच इतर ठिकाणी सपासप वार केल्याने चिंत्याला रक्तबंबाळ अवस्थेत गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नातेवाईकांनी आणले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला. परंतु काही वेळेतच चिंत्या याचे मृत्यू झाला.
याबाबत डहाणू पोलिसांना खबर मिळताच पो. निरीक्षक नागेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता आरोपी पांडू सावरा एका बाजूच्या घरात लपवून बसलेला होता. तिथून त्यास अटक करण्यात आली. डहाणू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सात आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याबाबत डहाणू पोलीस आधिक तपास करीत आहेत.