अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब रडारवर

By Admin | Updated: January 31, 2015 02:38 IST2015-01-31T02:38:10+5:302015-01-31T02:38:10+5:30

मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबचे भीषण वास्तव उघड केल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

Unauthorized Pathology Lab Radar | अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब रडारवर

अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब रडारवर

पूजा दामले, मुंबई
मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबचे भीषण वास्तव उघड केल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. महापालिकेने अनधिकृत लॅबवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर स्पष्ट केले. सुरुवातीला या प्रकरणावर बोलणे टाळणारे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही अखेर मौन सोडले. राज्य शासन अनधिकृत लॅब चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करेल, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य शासन अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबना नोटिसा पाठवून कारवाईला सुरुवातदेखील करणार आहे.
वैद्यकीय पदवी घेतल्यावर पदव्युत्तर (पॅथॉलॉजी) शिक्षण घेतलेले डॉक्टरच पॅथॉलॉजी लॅब सुरू करू शकतात. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (डीएमएलटी) अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची परवानगी नाही. या व्यक्ती रिपोर्ट देऊ शकत नाहीत. पॅथॉलॉजिस्ट कमी आहेत. यामुळे काही भागांमध्ये डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्ती पॅथॉलॉजी लॅब सुरू करतात. लोकमतच्या ‘स्टिंग’नंतर जे डीएमएलटीधारक सर्रास लॅब चालवत आहेत, ते आता राज्य सरकारच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईचे संकेतही सार्वजनिक आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत.
एखाद्या व्यक्तीला नक्की कोणता आजार झाला आहे, हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर रुग्णांना रक्त, लघवी, बॉडी फ्युएडच्या विविध तपासण्या करण्यास सांगतात. या रिपोर्टच्या आधारेच रुग्णांवर औषधोपचार केले जातात. निदानासाठी इतका महत्त्वाचा रिपोर्ट ज्या पॅथॉलॉजी लॅबमधून तयार होतो ती पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी कोठेही नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्यामुळे हजारो अनधिकृत लॅबचे जाळे पसरलेले असल्याचे ‘पॅथॉलॉजीचे पोस्टमार्टेम’ करताना समोर आले आहे. एखाद्या व्यक्तीला रुग्णालय अथवा रक्तपेढी सुरू करायची असल्यास त्यांना अधिकृत नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी त्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. पण, थेट आरोग्याशी संबंधित असलेल्या पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी सध्या निर्बंध नाहीत. नियम नाहीत, जिथे त्या व्यक्तीला काही कागदपत्रे सादर करावी लागतात. सरकार, महापालिका याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनधिकृत लॅबचे फावत असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे म्हणणे
आहे. (क्रमश:)

Web Title: Unauthorized Pathology Lab Radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.