Join us  

वर्सोव्यात लॉकडाऊनचा फायदा घेत खारफूटीची झाडे तोडून उभारल्या जात आहेत अनाधिकृत झोपड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 7:02 PM

मत्स्यउत्पादनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करत वादळात ढाल म्हणून मॅग्रोजची (खारफूटीची झाडे)झाडे बहुउपयोगी आहेत.

मुबंई : मत्स्यउत्पादनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करत वादळात ढाल म्हणून मॅग्रोजची (खारफूटीची झाडे)झाडे बहुउपयोगी आहेत. मात्र कोविड 19 च्या पादुर्भावामुळे गेल्या दि, 25 मार्चला देशात लॉकडाऊन सुरू झाला. मात्र वर्सोव्यात लॉकडाऊनचा फायदा घेत मॅग्रोज तोडून अनधिकृत झोपड्या उभारल्या जात आहे. जिकडे कच्चे बांधकाम होते तीे पक्की करण्यात आली आहेत.येथील गाळे भाड्याने देण्यात आले असून गाळे तयार करून दुकाने देखिल उघडण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर अनधिकृत झोपड्यांना वीज व पाणी आदी सुविधा देखिल पुरवल्या जात आहे अशी माहिती वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी लोकमतला दिली.

वर्सोवा येथील शास्त्री नगर,ऑफ यारी रोड,गंगा जमुना इमारती समोर तसेच पार्क प्लाझा, केंद्रीय मत्स्य विद्यापीठ,ऑफ यारी रोड व पालिकेच्या पेट पार्क, ऑफ यारी रोड,गजानन प्लॉट,ऑफ वाईल्ड वुड पार्क, आणि सिध्दार्थ नगर,ऑफ सरदार पटेल नगर या पाच ठिकाणी मॅग्रोज तोडून काही झोपड्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या तर काही झोपड्या या म्हाडाच्या जागेवर उभारल्या जात आहे.याबाबत आपण विधानसभेत आवाज उठवला होता,तर लॉकडाऊन मध्ये संबंधितांकडे तक्रारी सुद्धा केल्या होत्या अशी माहिती त्यांनी दिली. येथील काही झोपडीधारकांनी क्लस्टर नंबर देखिल मिळवले आहेत,त्यांची फेर तपासणी करावी. तसेच सदर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सदर प्रत त्यांनी उपजिल्हाधिकारी, के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त,अंधेरीचे तहशीलदार यांच्याकडे दिली आहे. 

टॅग्स :पर्यावरणमुंबई