चुनाभट्टीतील स्मशानभूमीत अनधिकृत बांधकामे

By Admin | Updated: November 25, 2015 02:37 IST2015-11-25T02:37:41+5:302015-11-25T02:37:41+5:30

गेल्या काही वर्षांपासून चुनाभट्टीतील स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच आता या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत.

Unauthorized constructions in the Chhambatti crematorium | चुनाभट्टीतील स्मशानभूमीत अनधिकृत बांधकामे

चुनाभट्टीतील स्मशानभूमीत अनधिकृत बांधकामे

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून चुनाभट्टीतील स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच आता या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. याबाबत येथील स्थानिक रहिवाशांनी पालिका, पोलीस आणि स्थानिक नेत्यांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
चुनाभट्टी परिसरातील चार लाख लोकसंख्येमागे येथे एकच स्मशानभूमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून येथे काहीही डागडुजी करण्यात न आल्याने स्मशानभूमीची मोठी दुरवस्था आहे. पालिका आणि स्थानिक नेते मात्र या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करीत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत एका महिलेने २००७ साली स्मशानभूमीच्या जागेत एक झोपडे तयार केले. तेव्हा स्थानिक रहिवासी आणि सामजिक कार्यकर्ते विजय साळुंके यांनी या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शवला. तथापि, राजकीय दबावातून आजवर या बांधकामावर काहीही कारवाई झालेली नाही. आता याठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पूर्वी पत्राचे असलेले झोपडे या महिलेने पक्के केले आहे. या प्रकाराला साळुंखेंनी विरोध केल्याने या महिलेने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. साळुंके यांच्याकडे मात्र स्मशानभूमीच्या जागेचे सर्व पुरावे पोलिसांना देखील दाखवले. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
ही हिंदू स्मशानभूमी पूर्वी ३ एकर सात गुंठे इतक्या जागेवर होती. मात्र पालिका आणि स्थानिक नेत्यांचे याठिकाणी दुर्लक्ष असल्याने गेल्या काही वर्षांत अनेक झोपड्या तयार झाल्या. रात्रीतूनच याठिकाणी डोंगर पोखरुन झोपड्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे सध्या केवळ दीड एकर जागा स्मशानभूमीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यातच स्मशानभूमीच्या आजूबाजूचा सर्व परिसर हा डोंगरावर वसलेला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व सांडपाणी हे स्मशानभूमीतच जमा होत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरलेली आहे. (प्रतिनिधी)
1चुनाभट्टी परिसरात राहणारे विजय साळुंके गेली ४० वर्ष या स्मशानभूमीत साफसफाईचे काम करतात. पालिका अथवा कोणाकडूनही त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन मिळत नाही. मात्र तरीही गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे त्यांचे काम नित्यनियमाने सुरु आहे. स्मशानभूमीत अतिक्रमण झाल्याचे समजताच त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता लढा सुरु ठेवला आहे.
2गेली आठ वर्षे या अनधिकृत बांधकामाविरुद्ध ते लढा देत आहेत. यासाठी रोज पालिका, पोलीस ठाणे आणि नेत्यांना भेटून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी ते करत आहेत. परिसरातील एक शिवसेना नेता या बांधकामांना संरक्षण देत असल्याने आमदार, नगरसेवक आणि पालिका अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. तथापि, स्मशानभूमीच्या जागेसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Unauthorized constructions in the Chhambatti crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.