आदिवासींच्या जागेवर अनधिकृत बांधकामे
By Admin | Updated: September 29, 2014 02:55 IST2014-09-29T02:55:11+5:302014-09-29T02:55:11+5:30
येथील बोर्डी तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत आदिवासींच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.

आदिवासींच्या जागेवर अनधिकृत बांधकामे
डहाणू : येथील बोर्डी तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत आदिवासींच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणातील शासकीय, अधिकारी, कर्मचार कामात गुंतल्याने त्याचा पुरेपूर फायदा काही भूमाफीयांनी उचलाला असून बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याची नागरीकांची तक्रार आहे.
डहाणू, तलासरी, तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासीची जमीन आहे. विशेष म्हणजे काही जणांची शेतजमीन तर मुंबई-अहमदाबाद हायवेला लागुन आहे. त्यामुळे आदिवासींच्या जमिनीवर ढाबे किंवा भंगारचे दुकान टाकून त्याची आदिवासीच्याच नावे कागदपत्रे तयार करून जमीन गिळंकृत करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. ही जमीन आदिवासींना कसण्यासाठी दिली असताना त्या ठिकाणी अन्य व्यवसाय केले जात आहे. डहाणूच्या गंजाड, रायतली तसेच महामार्गालगत असलेल्या आदिवासीच्या जमीनीवर फार्म हाऊस तसेच भाडोत्री चाळ उभी राहत आहे. आदिवासीकडून जमीन घेताना योग्य बाजारभाव, मोबदला आदी बाबींची आदिवासींना माहिती दिली जात नाही. आदिवासींची जमीन नियमानुसार विकता येत नसतानाही तसे प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आवश्यक कागदपत्रांची योग्य पूर्तता न करताच भुमाफीया आदिवासीच्या जमीनी ताब्यात घेत आहेत. त्यानंतर तीन, सहा महिन्यांनी ही जमीन मोठ्या लोकांना परस्पर विक्री केली जाते.
दरम्यान डहाणू, बोर्डी, आगर, नरपड, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आदिवासींच्या जमीन खरेदी विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून त्या जमीनीवर बेकायदेशीररित्या बांधकाम उभे राहत आहे. डहाणू चारोटी राज्यमार्गावर लागुनच असंख्य आदिवासींची जमीन आहे. तेथील जमीन डहाणूतील काही धनाढ्य लोकांनी घेऊन तेथे आलीशान फार्म हाऊस तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर जमीनीतून जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहच बदलण्यात आला आहे. त्या ठिकाणी मातीच्या भराव टाकण्यात आला आहे. शिवाय डहाणूच्या पारनाका, आगर, नरपड, चिखला भागात मोठ मोठी बांधकामे केली जात आहे. या भागात सी. आर. झेड लागु असताना तेथे बांधकामे उभी राहत असल्याने येथील सर्वसामान्य नागरीकांत आर्श्चय व्यक्त केले जात आहे.