कोपरखैरणेत अनधिकृत इमारत

By Admin | Updated: December 8, 2014 03:38 IST2014-12-08T03:38:29+5:302014-12-08T03:38:29+5:30

सिडको व महापालिकेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत.

Unauthorized building in Koparkhairane | कोपरखैरणेत अनधिकृत इमारत

कोपरखैरणेत अनधिकृत इमारत

नवी मुंबई : सिडको व महापालिकेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. कोपरखैरणे येथील माथाडी हॉस्पिटलला लागूनच एका बेकायदा इमारतीचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या विभाग कार्यालयासमोरच मागील काही दिवसांपासून एका बेकायदा इमारतीचे झपाट्याने काम सुरू आहे. या प्रकाराकडे दोन्ही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात सिडको आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी या विभागाची जबाबदारी आय.ए.एस.अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्यावर सोपविली आहे. केंद्रेकर यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेवून शहरातील कोणत्याही बेकायदा बांधकामांची गय न करता अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. इतकेच नव्हे, तर या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरू केली आहे. मात्र या कारवाईला न जुमानता भूमाफियांनी बांधकामे उभारण्याचा सपाटा सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोपरखैरणेतील महापालिकेच्या विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करून तशा आशयाचा अहवाल सिडकोला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या बांधकामांवर संयुक्त कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष गायकर यांनी लोकमतला दिली.
अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोने कंबर कसल्यानंतर काही भूमाफियांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. आपल्या बांधाकामांवरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी न्यायालयात धाव घेवून सिडकोच्या कारवाई मोहिमेला स्थगिती मिळविल्याचे समजते. जुहूगाव येथे अशाच प्रकारे उभारण्यात येत असलेल्या बेकायदा इमारतीला सिडकोने नोटीस बजावली होती. मात्र या बांधकामधारकाने न्यायालयात धाव घेऊन सिडकोच्या कारवाईला स्थगिती मिळविली आहे. विशेष म्हणजे स्थगिती असतानाही संबंधित विकासकाने इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.
या प्रकारची माहिती मिळताच तीन दिवसांपूर्वी सिडकोच्या पथकाने कारवाई केली. तसेच तेथील सिमेंटच्या गोण्या, बांधकामांसाठी लागणारे सिमेंटचे ब्लॉक आदी बांधकाम साहित्य जप्त केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized building in Koparkhairane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.