अंबरनाथमध्ये उभारली जातेय अनधिकृत इमारत
By Admin | Updated: January 7, 2015 23:19 IST2015-01-07T23:19:06+5:302015-01-07T23:19:06+5:30
अंबरनाथ रंगोली हॉटेलच्या शेजारी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. पालिकेकडून जी बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे

अंबरनाथमध्ये उभारली जातेय अनधिकृत इमारत
पंकज पाटील - अंबरनाथ
अंबरनाथ रंगोली हॉटेलच्या शेजारी बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. पालिकेकडून जी बांधकाम परवानगी घेण्यात आली आहे तिचे सर्व नियम धाब्यावर बसवून या बांधकाम व्यवसायिकाने इमारतीत अतिरिक्त बांधकाम करुन हे अनधिकृत प्लॉट ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एवढेच नव्हे ते तीन महिन्यांपूर्वी सुधारीत बांधकाम परवानगी घेतांना मूळ रस्ता न दाखविताच परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीचा काही भाग आरक्षित रस्त्याच्या जागेवर आला आहे. हे प्रकरण खुद्द जागेच्या मालकानेच उघड केले आहे. मात्र याप्रकरणी पालिका प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. पालिकेच्या या भूमिकेमुळे फ्लॅट घेणाऱ्या अनेक ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
हॉटेल रंगोली शेजारीच मौजे पाले गांवातील सर्व्हे नंबर ४९-५-१ ही ८०० चौरस मीटरची जागा मुकेश राजपालानी यांनी विकत घेतली. कालांतराने ती त्यांनी बहिणीचा नवरा अशोकभाई वालानी यांना विकली. मात्र बहीण आणि तिचा नवरा हे परराज्यात असल्याने या जागेचे सर्व व्यवहार मुकेश राजपालानी हेच करतात. या जागेवर इमारत उभारण्यासाठी सुनिल तलरेजा यांच्यासोबत करारनामा करण्यात आला. त्यानुसार अंबरनाथ नगरपरिषदेत बांधकाम परवानगी घेण्यात आली. ८०० चौरस मीटर जागेपैकी १४५ चौरस मिटरच्या जागेतून एमआयडीसीसाठी स्वतंत्र रस्ता आहे. ही जागा वगळता ६५५ चौरस मीटरच्या जागेवर अंबरनाथ पालिकेने ६२० चौरस मीटरच्या बांधकामाची परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात बांधकाम व्यवसायिकाने मंजूर नकाशापेक्षा जास्तीचे बांधकाम केले. तसेच हे बांधकाम करतांना रस्त्याची जागाही आपल्या इमारतीच्या आवारात घेतली.
हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नसून या बांधकाम व्यावसायिकाने जागामालकाची परवानगी न घेताच पालिकेतून सुधारीत बांधकाम परवानगी मिळवली आहे. ज्यावेळेस या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला त्यावेळेस अंबरनाथ पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार म्हणून कु.का. धरणे हे काम पाहत होते. त्यांनी या अर्जावर स्वाक्षरी केली नाही. मात्र धरणे नसतांना त्यांच्या जागेवर आलेले प्रभारी सहा. नगररचनाकार सुनील दुसाने यांनी या सुधारीत बांधकाम परवानगीवर स्वाक्षरी करून सर्व नियम धाब्यावर बसविले. सुधारीत बांधकाम परवानगीत १४५ चौ.मि. रस्ता दाखविला नाही. हा रस्ता आपल्या जागेत नसल्याचे नकाशे तयार करुन जास्तीच्या बांधकामाची परवानगी मिळविली आहे. जमिनीच्या मूळ मालकांनीच हे प्रकरण उघडकीस आणले.
इमारतीमधील त्रुटी
४सुधारीत बांधकाम परवानगीतून १४५ चौरस मीटरचा रस्ता गायब.
४नियमानुसार एमआयडीसीच्या जागेपासून ३ मीटरचे मार्जिन सोडलेले नाही.
४ एमआयडीसीचा ना- हरकत दाखला घेतला नाही.
आपल्याकडे या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यास लागलीच जागेवर या इमारतीच्या बांधकामाचे मोजमाप करण्यात येईल. तसेच नियमाप्रमाणे ही इमारत आहे की नाही याची तपासणी करण्यात येईल. यात बांधकाम व्यवसायीकाची चूक आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- कु.का.धरणे,
सहाय्यक नगररचनाकार,
अंबरनाथ नगरपरिषद