Join us  

रेल्वेने न जोडलेली ठिकाणे मेट्रो-३ मार्फत जोडली जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:21 AM

संडे स्पेशल मुलाखत; विवेक सहाय, माजी अध्यक्ष, रेल्वे बोर्ड

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) सुरू आहे. ही मार्गिका भविष्यात सुरू झाल्यावर मुंबईकरांना या मार्गिकेचा कसा फायदा होईल याबाबत रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनचे (ओआरएफ) फेलो विवेक सहाय यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न - मुंबईतील संपूर्णत: भुयारी मार्गिका असलेल्या मेट्रो-३ बाबत तुमचे मत काय आहे? मेट्रो-३ मार्गिकेची मुंबईला खरंच गरज आहे का?उत्तर - शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय रेल्वे उत्तम सेवा देत आहे. मुंबईकरांना रेल्वेमार्गे कमी खर्चात प्रवास करता येतो, मात्र बराचसा परिसर रेल्वेद्वारे जोडला गेला नसल्याने मुंबईकरांना अशा ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा विविध वाहतुकींचा पर्याय वापरावा लागतो. रेल्वेने न जोडली गेलेली ठिकाणे मेट्रोमुळे जोडली जाणार असल्याने प्रवाशांना भविष्यात या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

प्रश्न - मेट्रो आल्यावर मुंबईच्या संपूर्ण वाहतूक यंत्रणेमध्ये बदल होईल का?उत्तर - प्रवासी हे स्वस्त वाहतुकीकडे आकर्षिले जातात. भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर कमी अथवा परवडणारे तिकीट आकारले तर नक्कीच मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढेल. मी असे म्हणेन की, मेट्रोची स्थानकेही पुढील दहा वर्षांतील प्रवाशांची वाढणारी संख्या विचारात घेऊन बांधलेली असावीत. मेट्रोचे डबे काळानुसार वाढवणे गरजेचे आहे. रेल्वेचे नऊ डब्यांचे बारा डबे व्हायला आणि बारा डब्यांचे पंधरा डबे व्हायला सुमारे १५ ते २० वर्षांचा कालावधी लागला. मला आशा आहे की मेट्रो प्रशासन हे होऊ देणार नाही.

प्रश्न - मेट्रो-३ मार्गिका सुरू झाल्यावर रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी होईल का?उत्तर - दर ३ ते ५ मिनिटांनी रेल्वे स्थानकावर येत असते. रेल्वे हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन असल्याने सर्वसामान्य यास जास्त पसंती देतात. आपल्या नोकरीनिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर रेल्वेचा प्रवास करतात. यामध्ये दरदिवशी ३५ टक्के सिंगल तिकिटांची विक्री केली जाते. मुंबईतील प्रवाशांपैकी ९० टक्के प्रवासी सेकंड क्लासमधून तर १० टक्के प्रवासी फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असतात. यामुळे फर्स्ट क्लासमधून प्रवास करणारे प्रवासी मेट्रो सुरू झाल्यावर मेट्रोमधून प्रवास करतील.

प्रश्न - मेट्रो-३ आणि रेल्वे एकमेकांना जोडली जाणार आहे, याचा प्रवाशांना फायदा होईल का?उत्तर - रेल्वे, बस, मेट्रो-३ अशा विविध वाहतुकीद्वारे प्रवास करताना एकाच तिकिटावर प्रवास करता यावा, यामुळे प्रवाशांना मार्गिका अथवा वाहतुकीमध्ये बदल करताना त्रास होणार नाही आणि अगदी सहजतेने ते प्रवास करू शकतील.

प्रश्न - लोकसंख्येत होत असलेली वाढ आणि बदलते तंत्रज्ञान यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्था कशी असावी, असे तुम्हाला वाटते?उत्तर - आपल्याला राहण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. मात्र जमीन मर्यादित आहे. यामुळे जमिनीवर नियोजनबद्ध वाहतुकीची आवश्यकता आहे. मेट्रो येत आहे, मात्र आपल्याला जिथे जायचे असेल तिथपर्यंत मेट्रो पोहोचत नाही. यामुळे सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळापर्यंत पोहोचता येईल. विजेवर चालणाºया बसेस आणि इलेक्ट्रिक कार यांचा वापर भविष्यात वाढला पाहिजे, जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. खासगी वाहनांचा वापर कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि मेट्रोचा वापर वाढणे गरजेचे आहे.

- (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ‘मेट्रो क्युब’ या मासिकातून प्रसिद्ध झालेली मुलाखत.)

टॅग्स :मेट्रोमुंबई