उलवे नोड होणार दारुमुक्त

By Admin | Updated: January 28, 2015 00:50 IST2015-01-28T00:50:34+5:302015-01-28T00:50:34+5:30

दारूबंदीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असतानाच पनवेलमधील वहाळ ग्रामपंचायतीने देखील प्रजासत्ताक दिनी उलवे नोड दारूमुक्त क्षेत्र (नो लिकर झोन) करण्याची घोषणा केली.

Ulway node will become an ammunition free | उलवे नोड होणार दारुमुक्त

उलवे नोड होणार दारुमुक्त

वैभव गायकर, पनवेल
दारूबंदीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असतानाच पनवेलमधील वहाळ ग्रामपंचायतीने देखील प्रजासत्ताक दिनी उलवे नोड दारूमुक्त क्षेत्र (नो लिकर झोन) करण्याची घोषणा केली. यासंदर्भात वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीने ठराव करून इतरांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
सिडकोने विकसित केलेल्या खारघरपाठोपाठ वहाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील उलवे नोड हा महत्त्वाचा भाग आहे. विमानतळानजीक असलेल्या या नोडमध्ये मोठ्याप्रमाणात टोलेजंग इमारती आहेत. वहाळ ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वहाळ गावासह मोरावे, बामणडोंगरी, जावळे या चार गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. या नोडमध्ये २० ते २५ सेक्टरचा समावेश आहे. सिडकोने उभारलेला उन्नती गृहप्रकल्प देखील याच ठिकाणी आहे. दारूमुक्त क्षेत्र करण्याच्या ठरावाला ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांनी बिनविरोध पाठिंबा दिला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी पनवेल पंचायत समितीकडे पाठविण्यात आला.
संपूर्ण परिसरात दारूबंदी करण्यासाठी त्याठिकाणच्या ५० टक्के रहिवाशांनी दारूविक्रीला विरोध करणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत, अशी माहिती वहाळ गु्रपग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान उलवा परिसराला लागूनच असलेल्या बेलापूर, सीबीडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची दुकाने आणि मोठी हॉटेल्स आहेत. पनवेल तालुक्यातील पळस्पा फाटा याठिकाणीही मोठमोठे ढाबे असल्यामुळे परिसराचे महत्त्व पाहून या व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीकडे वाइनशॉप आणि बार सुरु करण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यास सुरुवात केली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही अशा व्यावसायिकांना ग्रामपंचायतीमार्फत परवानगी देणार नसल्याचा पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वहाळ ग्रामपंचायतीशी संपर्क करुन या निर्णयाचे स्वागत केले. त्यादृष्टीने परिसरातील सर्वच ग्रामपंचायती दारूबंदीसाठी पुढाकार घेणार आहेत. त्यामध्ये गव्हाण कोपर, न्हावे, तरघर, उलवा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, समाजसेवक रवी पाटील, वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच भीमाबाई वाघमारे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, रवींद्र पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य यांसह पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ulway node will become an ammunition free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.