उद्धवची छायाचित्रे अद्भुत - राज ठाकरे
By Admin | Updated: January 11, 2015 01:21 IST2015-01-11T01:21:09+5:302015-01-11T01:21:09+5:30
राजकीय पटावर प्रसंगी एकमेकांवर टीका करणारे राज आणि उद्धव ठाकरे शनिवारी एकत्र आले

उद्धवची छायाचित्रे अद्भुत - राज ठाकरे
मुंबई : राजकीय पटावर प्रसंगी एकमेकांवर टीका करणारे राज आणि उद्धव ठाकरे शनिवारी एकत्र आले ते, उद्धव यांच्या छायाचित्राच्या प्रदर्शनानिमित्ताने. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पण त्याचबरोबर प्रदर्शनातील छायाचित्रे म्हणजे हा एक वेगळा प्रयोग आहे आणि त्याला माझ्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असे राज म्हणाले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत भरविलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला मनसेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यानंतर ते म्हणाले, उद्धव आणि मी लहानपणापासून एकत्र आहोत. उद्धव हा अप्रतिम छायाचित्रकार आहे. विशेष म्हणजे, त्याने काढलेली छायाचित्रे विलक्षण आणि अद्भुत आहेत, अशी स्तुतिसुमने त्यांनी उद्धव यांच्यावर उधळली. आमचे कुटुंब कलाकारांचे असून, आम्ही प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलेचा वारसा पुढे चालवित आहोत. राज हादेखील चांगला व्यंगचित्रकार असून, त्याने माझ्या कलेबद्दल त्याचे प्रामाणिक मत नोंदविले आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या माध्यमातून शेतकरी वर्गाचे भले होत असेल तर माझ्या कलेचे सार्थक झाल्यासारखे होईल. शिवाय विज्ञान आणि कलेची सांगड या प्रदर्शनाच्या माध्यमातून घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)