Join us  

‘युतीचा विजय झाल्यास उद्धव मुख्यमंत्री व्हावेत’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:52 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला विजय मिळाला तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्यक्त केलीे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला विजय मिळाला तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्यक्त केलीे. एका संकेतस्थळाशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रश्नावर नेमलेल्या मध्यस्थ समितीमुळे आम्हाला दिलासा मिळाला असून आमचीही हीच मागणी होती. मात्र मंदिराचा मुद्दा संपलेला नसून आम्ही तो जिवंत ठेवला असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही धर्माचे राजकारण केले व देशात जोपर्यंत धर्मांचे राजकारण सुरू राहील तोपर्यंत हिंदू-मुस्लीम हा विषय राहील, असे ते म्हणाले. निवडणुकांसाठी केवळ धर्म नव्हे, तर जात व पोटजात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे देश सेक्युलर राहिलेला नाही, असे ते म्हणाले. देशभक्तीच्या लाटेत बेरोजगारी, महागाई हे मुद्दे बाजूला पडतात हे त्यांनी मान्य केले. आम्ही स्वत:ला चौकीदार समजत नाही, तर शिवसैनिकच समजतो, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रियांका गांधी या केवळ काँग्रेसच्या आहेत म्हणून आम्ही त्यांना का विरोध करायचा, असा प्रश्न त्यांनी विचारला. शिवसेनेचा कोणत्याही जाहीरनाम्यावर विश्वास नाही हे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना व भाजपा युती झाली नसती तर दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झाले असते, आमच्यामध्ये मतभेद असले तरी आमच्या भूमिका व मागण्या आहेत. मात्र, देशासाठी एकत्र आल्याचा दावा त्यांनी केला. युतीला स्वीकारण्याबाबतचा निर्णय जनता घेईल. नरेंद्र मोदी हे आधीपेक्षा मवाळ झाले आहेत. मोदी हा भाजपाचा चेहरा आहे; मात्र या वेळी भाजपाला २१० जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले. बाळासाहेब हुकुमशाह होते, उद्धव ठाकरे लोकशाही पद्धतीने पक्ष चालवतात. प्रत्येक नेत्याची पक्ष चालवण्याची आपली पद्धत असते, असे ते म्हणाले.

टॅग्स :संजय राऊत