उद्धव ठाकरे यांचा फोटो दिघेंच्या खाली

By Admin | Updated: August 2, 2015 03:26 IST2015-08-02T03:26:22+5:302015-08-02T03:26:22+5:30

बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर कोणाचे नाव घ्यायचे अथवा कोणाचा फोटो महत्त्वाचा, असा सवाल शिवसेनेत विचारला तर विचारणाऱ्यालाच जाब विचारला जाईल..! बाळासाहेबांच्या नंतर तमाम

Uddhav Thackeray's photo below digehane | उद्धव ठाकरे यांचा फोटो दिघेंच्या खाली

उद्धव ठाकरे यांचा फोटो दिघेंच्या खाली

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर कोणाचे नाव घ्यायचे अथवा कोणाचा फोटो महत्त्वाचा, असा सवाल शिवसेनेत विचारला तर विचारणाऱ्यालाच जाब विचारला जाईल..! बाळासाहेबांच्या नंतर तमाम शिवसैनिकांना गुरुस्थानी कोण? असे विचारल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवाय दुसरे नावच येऊ शकत नाही. मात्र ठाण्याचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या लेखी दिवंगत आनंद दिघे यांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. हे त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावरून स्पष्ट केले आहे.
फाटक हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने त्यांचादेखील त्यात फोटो असला तरी या जाहिरातीशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगत शिंदे यांनी स्वत:ला बाजूला करून घेतले आहे. गुरुपौर्णिमेचे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सामनाच्या पहिल्या पानावर फाटक यांनी जाहिरात दिली. त्यात बाळासाहेबांच्या बरोबरीने आनंद दिघेंचा फोटो वापरला गेला. याआधी सामनामधून असे कधीही छापून आल्याचे कोणाला आठवत नाही. त्यात उद्धव ठाकरेंना दिघेंच्या फोटोच्या खाली जागा देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धर्मवीर म्हणून दिघेंना सगळे ओळखायचे. ‘शिवसेनाप्रमुख ठाणे’ असा उल्लेखही दिघे आपल्या नावासोबत करायचे. त्यावर मातोश्रीवरून नाराजीदेखील व्यक्त व्हायची. मात्र दिघेंनी त्याकडे कधी लक्ष दिले नव्हते. या जाहिरातीत वापरलेली विशेषणेदेखील पुरेशी बोलकी आहेत. ‘‘स्व. बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहेत तर धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आमचे आदर्श स्फूर्तिस्थान आहेत’’ असे त्यात म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना फक्त आदरणीय एवढेच एक विशेषण लावण्यात आले आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांचा फोटो असला तरी त्यांच्या नावाचा उल्लेख त्यात नाही. एकनाथ शिंदे यांचे तसेच झाले आहे. हे दोघे नेमके कोणत्या विशेषणात मोडतात हेही त्यात नमूद नाही. ही जाहिरात ठाणे महापालिकेच्या समस्त नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी आणि समस्त शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

Web Title: Uddhav Thackeray's photo below digehane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.