Join us

शिक्षणव्यवस्थेचा खून!, लातूरमधील खासगी क्लास संचालकाच्या हत्येवरुन उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 09:39 IST

लातूरमध्ये एका खासगी क्लास संचालकाच्या हत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - लातूरमध्ये एका खासगी क्लास संचालकाच्या हत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ''एका क्लासचालकाचा खून झाला. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही तर तो राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचा खून आहे'', अशा शब्दांत त्यांनी सामना संपादकीयमधून टीका केली आहे.  शिवाय,  खासगी क्लासेसचा सुळसुळाट, त्यांचा अनियंत्रित कारभार आणि पालकांची अनिर्बंध लुटमार सरकार आणखी किती दिवस उघडय़ा डोळ्याने बघत बसणार आहे?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.  

काय आहे आजचे सामना संपादकीय?लातुरात कोचिंग क्लासेसच्या संचालकाची ज्या पद्धतीने सुपारी देऊन हत्या करण्यात आली त्या घटनेकडे अगदीच थंडपणे बघून चालणार नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला कलंकित करण्याचे काम या घटनेने केले आहे. या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर शिक्षणव्यवस्थेविषयीही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एकमेकांचे विद्यार्थी खेचण्याची भयंकर स्पर्धा खासगी शिकवण्या घेणाऱया क्लासेसचालकांमध्ये लागली आहे. त्यातून हा खून घडला. ‘स्टेप बाय स्टेप’ या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांना मध्यरात्री गाठून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी थेट चव्हाण यांच्या छातीत घुसली आणि ते जागेवरच कोसळले. ‘कुमार मॅथ्स क्लासेस’चा संचालक चंदनकुमार शर्मा याने तब्बल २० लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडविल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. हा चंदनकुमार मूळचा बिहारी. खरे म्हणजे कुठे बिहार आणि कुठे लातूर, पण बी.ई. मेकॅनिकल झालेला हा तरुण लातुरात येतो, विज्ञान शाखेचे क्लासेस सुरू करतो, खोऱयाने पैसा कमावतो आणि लाखो रुपयांची सुपारी  देऊन दुसऱया क्लासचालकाला जिवानिशी मारतो हा साराच प्रकार चक्रावून टाकणारा आहे. ज्या अविनाश चव्हाणची मदत घेऊन चंदनकुमारने आपला क्लासेसचा धंदा वाढवला त्याच चव्हाणची त्याने हत्या केली. पुन्हा अविनाश चव्हाणला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहण्यात, कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात हा चंदनकुमार सर्वात पुढे होता.

सुपारी घेणारे मारेकरी पोलिसांच्या हाती लागले म्हणून चंदनकुमारच्या मुसक्या आवळता आल्या, अन्यथा हा खून पचविण्याची जय्यत तयारी त्याने करून ठेवली होती. दोन्ही क्लासेसचालकांची भागीदारी, त्यांचे आर्थिक व्यवहार, भाजपच्या मंत्र्याचा अंगरक्षक राहिलेला मारेकरी हे सगळे आता तपासाचे विषय आहेत आणि त्यातून किती धक्कादायक माहिती पुढे येते, किती दडवली जाते हे बघावे लागेल. ज्या अविनाश चव्हाण यांची हत्या झाली त्यांच्या क्लासेसचे नाव ‘स्टेप बाय स्टेप’ असले तरी प्रत्यक्षात मात्र सगळे टप्पे झुगारून झटपट यश मिळविण्याकडे त्यांचा कल होता असेच दिसते. १३ दिवसांपूर्वीच चव्हाण यांनी आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी रुपयांची बक्षिसे वाटली होती. शिवाय पुढच्या वर्षासाठी दोन कोटींची बक्षिसे जाहीर केली होती. हे आकडे थक्क करणारे आहेत. खासगी शिकवण्यांचे अर्थकारण किती भयंकर आहे याचा अंदाज त्यावरून येऊ शकतो. कोटय़वधींची उलाढाल करणाऱया क्लासचालकांचे साम्राज्य आणि त्यांचे ऐश्वर्य पाहून खंडणी वसूल करणाऱया टोळ्याही आता लातुरात वाढल्या आहेत. राजस्थानातील कोटा आणि महाराष्ट्रातील लातूर ही दोन्ही शहरे खासगी शिकवण्यांच्या जणू राजधान्याच्या बनल्या आहेत. लातुरात आजघडीला किमान शंभर खासगी कोचिंग क्लासेसची ‘दुकाने’ सुरू आहेत. वेगवेगळ्या जिह्यांतून आलेले 25 हजारांहून अधिक विद्यार्थी या क्लासेसमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये भरून प्रवेश घेतात. दरवर्षी यातून सुमारे १५०० कोटींची उलाढाल होते. भरमसाट फी गेली तरी चालेल, पण या क्लासेसच्या कारखान्यातून बाहेर पडलेली मुले चांगले गुण घेऊन आयआयटी, मेडिकल, इंजिनीअरिंगला लागतील या आशेने पालकही दोन-दोन वर्षे लातुरात मुलांसोबत मुक्कामी येऊन राहतात. मुळात सरकारच्या शैक्षणिक यंत्रणेला आव्हान देणारी अशी समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी राहतेच कशी? सरकारही त्याला खतपाणी घालते. सगळाच भर जर खासगी शिकवण्यांवर द्यायचा असेल तर शाळा आणि महाविद्यालये हवीतच कशाला? पुन्हा खासगी क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेने आता शेवटचे टोक गाठले आहे. त्यामुळेच अविनाश चव्हाण यांच्या हत्येकडे ‘एक खून’ असा सामान्य दृष्टिकोन बाळगण्याची गफलत सरकारने करू नये. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राची किती वाताहत झाली आहे त्याचा हा धडधडीत पुरावा आहे. महाविद्यालये ओस पडली आणि खासगी शिकवण्यांची दुकानदारी मात्र जोरात सुरू झाली. शिक्षण क्षेत्राचा हा बाजार मन विषण्ण करणारा आहे. कधी काळी उत्तम शिक्षणामुळे लातूर पॅटर्न राज्यात गाजला होता. त्याच लातुरात आज खासगी क्लासेसच्या माध्यमातून एक समांतर शिक्षणव्यवस्था उभी राहिली आहे. त्यातून एका क्लासचालकाचा खून झाला. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही तर तो राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचा खून आहे. खासगी क्लासेसचा सुळसुळाट, त्यांचा अनियंत्रित कारभार आणि पालकांची अनिर्बंध लुटमार सरकार आणखी किती दिवस उघडय़ा डोळ्याने बघत बसणार आहे?

टॅग्स :शिवसेनाखूनउद्धव ठाकरेलातूर