Join us  

शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 8:33 AM

उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब आणि शिवसेनेच्या 18 खासदारांसोबत अयोध्येला जाणार आहेत. सकाळी 9 वाजता ते अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीही मागच्या नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत गेले होते. त्यावेळी राम मंदीराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

सकाळी उद्धव ठाकरे विमानाने फैजाबादला पोहचतील तेथून ते गाडीने अयोध्येसाठी रवाना होतील. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता ते अयोध्येत दाखल होतील त्यानंतर 10 वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील अशी माहिती अयोध्या दौऱ्याचे संयोजक खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जागोजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिग्ज आणि फलक लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे. 

तसेच अयोध्या दौऱ्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहेत. राज्यपाल भवनात आज सकाळी 11 वाजता नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यात शिवसेनेच्या वाट्याला 2 मंत्रिपद मिळालं असून शिवसेनेकडून अनिल परब किंवा तानाजी सावंत आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदासाठी संधी मिळणार आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्या