Join us  

पुण्यातील पगडीच्या राजकारणाचे लोन आता लाल किल्ल्यावरील भगव्या फेट्यापर्यंत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 8:25 AM

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाल किल्ल्यावरून मोदींनी केलेल्या भाषणावर टिपण्णी केली आहे.पंतप्रधानांनी या वेळी लाल किल्ल्यावरून भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद आहे.

मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाल किल्ल्यावरून मोदींनी केलेल्या भाषणावर टिपण्णी केली आहे.पंतप्रधानांनी या वेळी लाल किल्ल्यावरून भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद आहे. 2019च्या निवडणुकांत पुन्हा एकदा ‘हिंदू’ म्हणून मतदारांना साद घालण्याचा हा प्रकार आहे. पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण आता लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  पण डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील काय? अयोध्येत राममंदिराचे काय होणार? ते कधी उभे राहणार? यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर लाल किल्लाही रोमांचित झाला असता व लाल किल्ल्यानेच स्वतःच्या डोक्यावर भगवा फेटा बांधून घेतला असता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.काय आहे सामनाच्या संपादकीयमध्ये ?लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी काय बोलणार याची तशी उत्सुकता फारशी नव्हतीच. कारण मोदी काय बोलणार हे देशाला माहीतच होते. पंतप्रधानांनी देशवासीयांची निराशा केली नाही. 70-72 वर्षे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलत आहेत. पंतप्रधान म्हणून ‘मोदी’ यांनी पाच भाषणे केली. साधारण विषय तेच आहेत. प्रत्येक भाषणात गरीबांचा कळवळा हा असतोच व तोच याही वेळी प्रमुख विषय होता. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरूनच पाकिस्तानला सज्जड दम दिला होता. पाकव्याप्त कश्मीरातील गिलगिट-बाल्टिस्तान वगैरे भागातील असंतोषासंदर्भात हिंदुस्थानचे सैन्य पाकव्याप्त कश्मीरात घुसू शकते, असे संकेत त्यांनी दिले होते, पण तीन वर्षांत आमच्याच सैन्याचे सर्वाधिक बळी गेले. पंतप्रधान मोदी यांची भाषणे म्हणजे आकडे, घोषणा व योजनांची आतषबाजी असते व त्यासाठी लाल किल्ल्याचे प्रयोजन केले जाते.  प्रश्न हिंदुत्वाचाच निघाला आहे म्हणून समान नागरी कायदा आणि कश्मीरातील 370 कलमाची आम्ही मोदींना आठवण करून द्यायची गरज नाही.कश्मिरी पंडितांच्या घरवापसीलाही पंतप्रधानांनी बगल दिली आहे व हे सर्व विषय त्यांच्या डोक्यावरील भगव्या पगडीशी संबंधित आहेत. काँग्रेसने साठ वर्षांत काहीच केले नाही व 2013 पर्यंत विकासाचा वेग साफ मंदावला होता, अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे. पण आजच हिंदुस्थानी रुपयाचा भाव साफ कोसळला आहे. एका डॉलरसाठी जर आता 70 रुपये मोजावे लागत असतील तर हे काही उत्तम अर्थव्यवस्थेचे आणि गतिमान विकासाचे लक्षण नाही. मग गेल्या चार वर्षांत ‘रुपया’ तिरडीवर पडला आहे. त्या मागची कारणे यापेक्षा वेगळी आहेत काय? रुपया पडतो व शेअर बाजार उसळतो हे नवे अर्थशास्त्र नेमके काय आहे? इकडे रुपयाने मान टाकली आहे आणि तिकडे पंतप्रधान म्हणत आहेत की, येत्या काही काळात हिंदुस्थान विश्वगुरू होणार. हा तर्क कसा लावायचा? एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातील पाच कोटी जनता गेल्या दोन वर्षांत गरिबी रेषेतून वर आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्याबद्दल मोदींचे अभिनंदन. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालावर आपण कधीपासून अवलंबून राहायला लागलो? पंडित नेहरू यांनी कश्मीरचा प्रश्न ‘युनो’त म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला म्हणून नेहरू हे गुन्हेगार ठरवले गेले आहेत. अशा आंतरराष्ट्रीय अहवालांना आगापिछा नसतो हे समजून घेतले पाहिजे. शेतकरी आजही आत्महत्या करतोय व देशातील सर्वच जाती ‘मागासवर्गीय’ म्हणून नोकरीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत व पंतप्रधानांनी जाती प्रथा नष्ट करण्याचे सोडून जातनिहाय आरक्षण कायम ठेवू असे जाहीर केले. पुन्हा भूकबळी व कुपोषण आहेच. मात्र हे त्या आंतरराष्ट्रीय संस्थेस दिसू नये याचे आश्चर्य वाटते. लाल किल्ल्यावरील जोरकस भाषणात पंतप्रधान म्हणाले की, जनता आता प्रामाणिकपणे कर भरतेय व त्यांच्यामुळेच देशाच्या योजना चालतात हे बरोबर आहे, पण जनतेने प्रामाणिकपणे भरलेल्या करांची लूट करून नीरव मोदीसारखे उद्योगपती पळून गेले ही देशाची लूट आहे. याच प्रामाणिक करदात्यांच्या पैशांतून पंतप्रधान परदेश दौरे करतात व चार हजार कोटीवर भाजपच्या जाहिरातबाजीवर खर्च झाले. जनतेच्या योजनांचाच पैसा त्यात उडाला. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषणांचा पाऊस पाडला. नव्या योजना जाहीर केल्या. 2019 च्या निवडणुकांचे जोरदार भाषण पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले. दोन वर्षांपूर्वी ते ‘नोटाबंदी’वर बोलले होते. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवाद व बनावट नोटा छापण्याचे प्रकार बंद झाले असे ते दणकून म्हणाले होते, पण उलटेच घडले. ‘नोटाबंदी’चा परिणाम असा की, कश्मीरात आतंकवाद वाढला, सैनिकांचे हौतात्म्य वाढले. पूर्वी आमच्या बनावट नोटा पाकिस्तान आणि नेपाळात छापल्या जात होत्या. आता दोन हजारांच्या गुलाबी नोटा चीनमध्ये छापून येथील चलनात आल्या आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरे