Join us  

Uddhav Thackeray: 'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 2:44 PM

बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणार असून राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे.

मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुखांची चांगलीच गोची झाली. अखेर या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधिते केले. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांचे कौतुक झाले. तर, बंडखोर आमदारंविरुद्ध रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील सर्वात मोठ्या या घडामोडींवर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही प्रतिक्रिया दिली. 

बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणार असून राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे. तत्पूर्वी या घडामोडींवर अनेकजण प्रशंसा आणि टीका करत आहेत. राजू शेट्टी यांनीही फेसबुक अकाऊंटवरुन महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर कडक शब्दात टीका केली. महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्धवस्त झाल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या काही सत्तापिपासू नेत्यांनी स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा एक बांबू उपसला. पण, ईडीच्या वादळात याच नेत्यांमुळे महाविकास आघाडीचा अख्खा वाडा उद्धवस्त झाला, अशी टिकात्मक पोस्ट राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. दरम्यान, शेट्टी यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेत राज्यातील सत्तापिपासू नेते असा उल्लेख करत महाविकास आघाडीवर टिका केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. 

यापूर्वीही ट्विटमधून निशाणा

राजू शेट्टी यांनी यापूर्वीही ट्विट करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेद होत आहेत. अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत शेट्टींनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे, राजू शेट्टींनी नेमका कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.  

टॅग्स :राजू शेट्टीउद्धव ठाकरेमहाविकास आघाडी