उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याचीही पात्रता नाही
By Admin | Updated: August 15, 2014 00:36 IST2014-08-15T00:35:47+5:302014-08-15T00:36:22+5:30
नीतेश राणे: बाळासाहेबांच्या नावावर त्यांचे राजकारण --विधानसभा लढविणारच

उद्धव ठाकरे यांची सरपंच होण्याचीही पात्रता नाही
कोल्हापूर : मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साधी सरपंच होण्याचीही पात्रता नाही, अशी बोचरी टीका आज, गुरुवारी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी येथे केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोल्हापुरात ते एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ज्या उद्धव ठाकरे यांनी विधानसभा नीट आतूनही पाहिलेली नाही, ते मुख्यमंत्रिपदासाठी विधानसभा निवडणूक लढविण्याची भाषा करीत आहेत. त्यांची सरपंच होण्याचीही पात्रता नाही. हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीत उतरूनच दाखवावे, असे आव्हान राणे यांनी यावेळी दिले.
उद्धव ठाकरे यांच्यात जनतेमधून निवडून येण्याची क्षमता नाही. आपल्या भावना शिवसैनिकांवर लादून त्यांनी पद मिळविले आहे. त्यांंनी कधीही कार्यकर्त्यांचा विचार घेतला नाही. केवळ बाळासाहेबांच्या नावावर त्यांचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची भाषा करणारे ठाकरे हे मागील दाराने येणारे नेते आहेत. पुढच्या दाराने येण्याची क्षमता त्यांच्यात नाही. उद्या राखी सावंत महाराष्ट्राची मुख्यमंत्री होण्याची भाषा करील, अशी कोपरखळीही त्यांनी हाणली.
लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या पराभवाबाबत विचारले असता ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोदी लाट नव्हती. दुसऱ्या फळीतील नेत्यांवरील नाराजीचा परिणाम निवडणुकीवर झाला. त्याचबरोबर यंत्रणा जनसंपर्कात कमी पडली. सिंधुदुर्गमधील राजकारण राणेंभोवतीच फिरत आहे. येथे कोणीही काहीही म्हटले तरी नारायण राणे म्हणतील तेच या ठिकाणी होईल. विधानसभा निवडणुकीसाठी आपण कणकवली मतदारसंघातून तयारी करणार आहे.
नारायण राणे यांना दिलेले पद हे पक्षाने त्यांचा केलेला सन्मान आहे. त्यांनी स्वार्थासाठी नाही तर पक्षासाठी व जनहितासाठी पदाची मागणी केली होती. राणे यांच्यावर टीका करण्यापेक्षा विरोधकांनी त्यांच्या विकासकामांशी स्पर्धा करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक, सचिन तोडकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विधानसभा लढविणारच
आगामी विधानसभा निवडणूक आपण लढविणार असल्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी आज, गुरुवारी येथे जाहीर केले. संयोजकांनी निमंत्रण पत्रिकेत आपल्या नावापुढे आमदार टाकले आहे. त्यांच्याकडून हे चुकून झाले आहे; परंतु येणाऱ्या काळात या निमंत्रण पत्रिकेचा निश्चित उपयोग होईल. कारण येणारी विधानसभा निवडणूक आपण लढविणार आहोत, असे नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.