Join us

दोन वर्षांत ‘ती’ दोनदा गेली पळून, पुस्तकाऐवजी हातात दारूची बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 06:13 IST

अभ्यासाच्या पुस्तकाऐवजी सातवीत असतानाच हातात सिगारेट आणि दारुची बाटली आली. गंमत म्हणून घेतलेली दारु आणि सिगारेट आता तिच्या हातातून सुटेनाशी झाली. याच व्यसनाधीन अवस्थेतच तिने दोनदा घर सोडल्याचा प्रकार नायगावमध्ये घडला. याप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियांसह पोलिसही हैराण झाले आहेत.

- मनीषा म्हात्रेमुंबई : अभ्यासाच्या पुस्तकाऐवजी सातवीत असतानाच हातात सिगारेट आणि दारुची बाटली आली. गंमत म्हणून घेतलेली दारु आणि सिगारेट आता तिच्या हातातून सुटेनाशी झाली. याच व्यसनाधीन अवस्थेतच तिने दोनदा घर सोडल्याचा प्रकार नायगावमध्ये घडला. याप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियांसह पोलिसही हैराण झाले आहेत. व्यसन सोडविण्यासाठी तिच्या कुटुंबियांकडून उपचारही सुरु करण्यात आलेले आहेत.      नायगाव परिसरात ५८ वर्षाचे तक्रारदार वडील पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतात. त्यांचा टेलरचा व्यवसाय आहे. मुलींनी शिकून मोठे व्हावे म्हणून त्यांची धडपड सुरु होती. अशातच मधली मुलगी नेहा नशेच्या आहारी गेल्याने त्यांनाही धक्का बसला. नेहा  एका नामांकीत शाळेत नववी इयत्तेचे शिक्षण घेत आहे. अभ्यासात हुशार असलेल्या नेहाच्या स्वभावातील बदलावामुळे कुटुंबियांना धक्का बसला. सातवीत असताना ती वाईट मैत्रीणींच्या संगतीत आली. एक वेगळी नशा म्हणून तिने सिगारेट आणि दारुचे सेवन केले. याच नशेत ती इतकी हरवली की त्यातून बाहेर येणे कठीण झाले. खाऊसाठी दिल्या जाणाºया पैशांतून नेहा सिगारेट आणि दारुचे व्यसन करत. हळूहळू नेहाकडून पैशांची मागणी वाढू लागली. ती नशेत घरी यायला लागली. घरी आल्यानंतर एका ठिकाणी ती निपचीत पडून असे. मात्र मुलीच्या बदलामुळे वडीलांना संशय आला. तिने नशा केल्याचे त्यांना समजताच त्यांनाही धक्का बसला.     त्यांनी तिला पैसे देणे बंद केले.  तिला नशेपासून दुर करण्यासाठी भायखळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले.   घरातून पैसे मिळणे बंद झाल्याने नशेसाठी नेहा घरातून पळून गेली. कुटुंबियांच्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केली. तपास सुरु असतानाच ती घरी परतली होती. तेव्हा पासून कुटुंबिय तिला एकटे सोडत नव्हते.     १० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास लहान मुलीला गुडघे दुखीचा त्रास होत असल्याने नेहालाही सोबत घेऊन रुग्णालय गाठले. सायंकाळी साडे सातच्या सुमारास ते दोन्ही मुलींसोबत राहत्या इमारतीजवळ पोहचले. इमारतीच्या जीना चढत असताना नेहाने नैसर्गिक विधीचे कारण पुढे करुन घराच्या दिशेने पळाली. काही वेळाने आई वडील घराकडे आले तेव्हा नेहा गायब होती. त्यांनी संपूर्ण इमारतीची झडती घेतली मात्र ती कुठेच सापडली नाही. मुलीच्या शोधात संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यानंतर जवळचे  नातेवाईक, मित्र मैत्रीणींसह नायगाव, दादर, माटुंगा रेल्वे स्थानक पिंजून काढला. तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने १० तारखेला त्यांनी निराश अवस्थेत भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हते म्हणून भोईवाडा पोलिसांनी तपास सुरु केले. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हा तपास सुरु असताना दोन दिवसाने ती घरी परतली. ती कुठे व कुणाकडे होती? याबाबत तिने काहीही माहिती दिली नाही. तपास सुरु...नेहा मंगळवारी घरी परतली आहे. गेल्यावेळेसह ती अशीच निघून गेली होती. मात्र ती स्वत:हून घरी परतली. ती कुठे व कुणाकडे गेलेली याबाबत काहीही माहिती देत नाही आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली. 

टॅग्स :मुंबईगुन्हा