चेंबूर,अणुशक्ती मतदारसंघात दोनच महिला उमेदवार
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:29+5:302014-10-03T22:56:29+5:30
चेंबूर,अणुशक्ती मतदारसंघातून २५ उमेदवारांत केवळ दोनच महिला

चेंबूर,अणुशक्ती मतदारसंघात दोनच महिला उमेदवार
च ंबूर,अणुशक्ती मतदारसंघातून २५ उमेदवारांत केवळ दोनच महिला मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या चेंबूर आणि अणुशक्ती या दोन्ही मतदार संघामध्ये यंदा केवळ दोनच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही महिला उमेदवार या मनसेकडून उभ्या आहेत. दोन्ही मतदार संघामध्ये एकूण २५ उमेदवार असून पैकी २३ उमेदवार पुरुष असल्याने दोन महिला कशी टक्कर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता चेंबूर आणि अणुशक्तीनगरमध्ये खर्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. चेंबूर मतदार संघात सध्या १० उमेदवार रिंगणात आहेत. तर अणुशक्ती मतदरासंघात १५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. चेंबूरमध्ये २००४ पूर्वी भाजपाची सत्ता होती. मात्र त्यानंतर या ठिकाणी २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. सध्या याठिकाणी चंद्रकांत हांडोरे हे आमदार आहेत. मात्र आघाडी तुटल्यानंतर याठिकाणी राष्ट्रवादीकडून रवींद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रिपाइं आणि भाजपाच्या युतीमुळे ही जागा रिपाइंच्या कोट्यात गेली असून रिपाइंकडून दीपक निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून प्रकाश फातर्पेकर हे रिंगणात असून बीएसपीकडून राजू सोनटक्के आणि काही अपक्ष असे एकूण १० जण रिंगणात आहेत. यामध्ये मनसेकडून सारिका सावंत-थडानी या एकमेव महिला उमेदवार आहेत. २००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसे दुसर्या क्रमांकावर होती. त्यामुळे सावंतांना यंदा चांगली मत मिळतील, असे चित्र आहे. अशाच प्रकारे अणुशक्ती मतदार संघात देखील केवळ मनसेची महिला उमेदवार आहे. १५ उमेदवारांमध्ये एकटीच महिला उमेदवार असून राष्ट्रवादीकडून नवाब मलिक, सेनेकडून तुकाराम काते, काँग्रेसकडून राजेंद्र माहूलकर, भाजपाकडून विठ्ठल खरटमोल, शेकापकडून अकबर हुसेन असे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. मनसेच्या वीणा उकरंडे या एकमेव महिला उमेदवार आहेत. चेंबूर आणि अणुशक्तीनगरमधील या मनसेच्या दोन्ही महिला उमेदवार निवडणुकीत कशी टक्कर देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (प्रतिनिधी)