Join us  

प्रवाशांसाठी दोन हजार टॅक्सी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:30 AM

टॅक्सी सेवा देताना फिझिकल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत विशेष रेल्वे सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची सोय व्हावी यासाठी टॅक्सी सेवाही सुरू झाली आहे. त्यानुसार, सोमवारी सुमारे दोन हजार टॅक्सी रस्त्यावर उतरल्या.

प्रवाशांकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, वांद्रे टर्मिनल्स येथे ही टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.टॅक्सी शोधण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडू नये म्हणून रेल्वे स्थानकांवर मुंबई टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स म्हणाले, लॉकडाउनमध्ये टॅक्सी सेवा बंद असल्याने अनेक चालकांची, त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. आता टॅक्सी सेवा काही अंशी सुरू झाल्याने दिलासा मिळेल. शिवाय यामुळे प्रवाशांचीही सोय होईल.

टॅक्सी सेवा देताना फिझिकल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर टॅक्सी बुकिंग करता येईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवर दिल्लीवरून काही रेल्वेगाड्या मंगळवारी येणार असून प्रवाशांनी ५०० टॅक्सींचे बुकिंग आधीच केल्याचे त्यांनी सांगितले.

तर, सीएसएमटीवर टॅक्सी चालक थांबतात. त्यांना १८ नंबर प्लॅटफॉर्मकडे सोडले जात नाही. तसेच त्या ठिकाणी जाणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आल्याची नाराजी स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी व्यक्त केली.दरम्यान, टॅक्सीचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडे रेल्वे तिकिटांची इलेक्ट्रॉनिक प्रत आवश्यक आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस