महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:54+5:302021-02-05T04:25:54+5:30
महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन हजार कोटी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात ...

महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन हजार कोटी
महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन हजार कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपये, तर गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यासाठीही १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्ती करताना काँक्रिटच्या रस्त्यांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये १५७ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. त्यातील १४५ किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. यासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक वाहनतळांसाठी विभाग पातळीवर व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
नरीमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा सागरी किनारी मार्ग २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. या प्रकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असल्याने कोस्टल रोडसाठी आगामी आर्थिक वर्षातही मोठी तरतूद करण्यात आली आहे. लांबणीवर पडलेला गोरेगाव - मुलूंड जोड रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून सुटका करण्यासाठी पालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने विद्यमान आर्थिक वर्षात १२३ किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. त्यात ६६ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि ५७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
वाहनतळाच्या नियोजनासाठी वाहनतळ प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. यानुसार जीआयएस मॅपिंग करून विभागनिहाय आराखडा तयार करण्यात येईल. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर वाहनतळांच्या विकासासाठी करण्यात येईल. तसेच मुंबईतील पदपथावरील अडथळे दूर करून ते चालण्यायोग्य बनविणे व त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. यासाठी १६० किलोमीटरचे १४९ पदपथ तयार करण्यात येतील. तसेच १२८ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. यात त्यांची रचना, प्रकाशयोजना, विभाजन आकर्षक पद्धतीने हाेईल.
* पुलांची डागडुजी
मुंबईतील २१ धोकादायक पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी, ४७ पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या हाती घेण्यात आल्या आहेत. यापैकी ६० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. तसेच शहरातील ३४४ पुलांपैकी ४२ पुलांखाली नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यात काही पुलांखाली हॉकी स्टेडियम, उद्यान, आकर्षक पदपथ तयार करण्यात येतील.
.......................................