अपघातात दोन विद्यार्थी ठार
By Admin | Updated: March 29, 2017 03:55 IST2017-03-29T03:55:08+5:302017-03-29T03:55:08+5:30
स्कुटीला अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत त्यावर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला

अपघातात दोन विद्यार्थी ठार
मुंबई : स्कुटीला अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत त्यावर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी घडला. या प्रकरणी समतानगर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
साझ तिरंदाज आणि बिलाल अंसारी अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे मीरा रोडचे राहणारे आहेत. वांद्रेच्या रिझवी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीत शिकत होते. तिरंदाज हा हॉटेल मॅनेजमेंट तर बिलाल पर्यटन विषयाचे शिक्षण घेत होता. समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे कॉलेजमधून घरी निघाले होते. त्या वेळी कांदिवलीच्या महिंद्रा गेटसमोर त्यांना एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. कारण त्यांच्या स्कुटीच्या मागचा भाग काही प्रमाणात चेपल्याचे दिसत आहे. ज्यामुळे त्यांची स्कूटर समोरच्या दुभाजकाला जाऊन धडकली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे स्कूटरवर बसलेले दोघेही गाडीवरून खाली पडले आणि त्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अनोळखी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)