जिल्ह्यात दोनच दुकान निरीक्षक
By Admin | Updated: December 26, 2014 22:42 IST2014-12-26T22:42:07+5:302014-12-26T22:42:07+5:30
जिल्ह्यातील दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दुकान निरीक्षकांवर असते. मात्र गेल्या तीन वर्षभरापासून जिल्ह्यात दोनच दुकान निरीक्षक कार्यरत असल्याने त्यांनी पुरती तारांबळ उडत आहे.

जिल्ह्यात दोनच दुकान निरीक्षक
प्रशांत शेडगे, पनवेल
जिल्ह्यातील दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दुकान निरीक्षकांवर असते. मात्र गेल्या तीन वर्षभरापासून जिल्ह्यात दोनच दुकान निरीक्षक कार्यरत असल्याने त्यांनी पुरती तारांबळ उडत आहे. संबंधित विभागात रिक्त जागा भरल्या जात नसल्याने या दोन निरीक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
दुकान सुरु करीत असताना दुकाने निरीक्षकांकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय दुकान सुरुच ठेवता येत नाही किंवा व्यवसाय करता येत नाही. रायगड जिल्ह्यातील दुकानांना परवाना देण्याचे काम सहाय्यक कामगार आयुक्तालयातून होते. दुकाने निरीक्षकांना तालुके आणि भाग वाटून देण्यात आले आहेत. त्यांचे वारही ठरले आहेत.
पनवेल परिसरातील परवाने खांदा वसाहतीतच मिळतात. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, वडघर, करंजाडे,उलवे, नावडे, विचुंबे, आदई, पळस्पे, उसर्ली, सुकापूर या ठिकाणी दुकानांची संख्या जास्त आहे आणि ती वाढतच चालली आहे. त्याचबरोबर उरण, महाड, खोपोली, कर्जत, पेण, अलिबाग, मुरुड, माणगांव या ठिकाणी दरमहिन्याला सुमारे ८०० ते ९०० अर्ज येतात. त्यातच पनवेलच्या नागरीकरणाच्या कक्षा रुंदावल्याने या भागातून सर्वाधिक अर्ज दुकाने निरीक्षकांकडे येतात.
मूळ मालक असेल त्याचे कागदपत्र किंवा भाडेतत्त्वावर घेतले असेल तर करारनामा, रहिवासी व ओळखपत्राचा पुरावा या सर्व गोष्टींची पडताळणी करावी लागेल. ए व बी अर्जातील मजकूर व स्टेट बँक आॅफ इंडियात भरणा केलेली चलने आदी बाबी तपासून पहाव्या लागतात. या व्यतिरिक्त दुकानावर फलक लावला की नाही तसेच या ठिकाणी किती कामगार काम करतात या गोष्टी निरीक्षकाला पडताळाव्या लागतात. केवळ दुकानांचा परवाना देणे इतकेच काम संबंधित दुकाने निरीक्षकांचे नसून मुंबई दुकाने व संस्था अधिनियमानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.
विशेषत: रात्री १० वाजल्यानंतर दुकाने सुरु ठेवणे, त्याचबरोबर आठवड्यातून एकदा सुटी न घेणे कामगारांना दररोज रोजंदारी देणे, बालकामगार कामावर न ठेवणे, निवडणुकीच्या दिवशी कामगारांना सुटी देणे आदी विविध गोष्टींचे पालन होते की नाही हे पाहणे. विशेषत: मराठीतून पाट्या लावल्यात की नाही त्याबाबत पाहणी करण्याची जबाबदारी दुकाने निरीक्षकांची असते. याकरिता अचानक दुकानांना भेटी देऊन तपासणीही करावी लागते.
निरीक्षकांवर कामाचा मोठा भार असून दुकानांची नोंदणी त्याचबरोबर इतर माहिती रजिस्टरमध्ये भरावी लागते. जिल्ह्यात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले असल्याने व्यापाऱ्यांचे केंद्रीकरण झाले आहे. त्यांचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुकाने निरीक्षक कार्यालयावर झाला आहे. त्यामुळे या विभागात रिक्त पदे भरण्याबरोबच वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे.