भिवंडीत राष्ट्रवादीला भाजपाने दिले दोन धक्के
By Admin | Updated: June 2, 2014 23:06 IST2014-06-02T22:03:35+5:302014-06-02T23:06:47+5:30
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाने चंद्रकांत जाधव यांना बिनविरोध सभापती करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास शह दिला.

भिवंडीत राष्ट्रवादीला भाजपाने दिले दोन धक्के
अनगाव : १५ वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाने चंद्रकांत जाधव यांना बिनविरोध सभापती करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास शह दिला. राष्ट्रवादीच्या ताब्यात १५ वर्षांपासून असलेली अनगाव ग्रामपंचायत ताब्यात घेऊन दुसरा जबरदस्त धक्का खा. कपिल पाटलांनी दिल्याने आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनगाव ग्रामपंचायत ग्रामस्थांनी ६२ वर्षांनी बिनविरोध केली. त्यामध्ये अडीच वर्षे राष्ट्रवादी व अडीच वर्षे भाजपा-शिवसेना यांना देण्यासंबंधी आपसात करार करण्यात आला होता. मात्र, महायुतीचे खासदार निवडून येताच युतीच्या शिलेदारांनी तो करार मान्य नसल्याचे सांगून वेगळी चूल मांडली आणि २५ मे रोजी झालेल्या सरपंचाच्या निवडणुकीत भाजपाचे सरपंच, उपसरपंच बसवून पंचायत ताब्यात घेऊन भाजपा, राष्ट्रवादीला धक्का दिला. बाजार समिती आणि अनगाव पंचायत यावर राष्ट्रवादीची सत्ता उलथवून नवनिर्वाचित खासदारांनी आघाडीवरचा राग काढण्यास सुरुवात केली आहे. यापुढे असे एकेक धक्के आघाडीला मिळतील, असे संकेत आहेत.
(वार्ताहर)