तरुणीवर बलात्कार करणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: May 20, 2015 00:38 IST2015-05-20T00:38:16+5:302015-05-20T00:38:16+5:30
एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार करून नंतर तिच्या लहान बहिणीवरदेखील वाईट नजर ठेवणाऱ्या दोन तरुणांना वाकोला पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली.

तरुणीवर बलात्कार करणारे दोघे गजाआड
मुंबई : एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार करून नंतर तिच्या लहान बहिणीवरदेखील वाईट नजर ठेवणाऱ्या दोन तरुणांना वाकोला पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली.
महेश घाग (२८) आणि बाळू धोतरे (३८) अशी आरोपींची नावे आहेत. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी हे कालिनातील जांभळीपाडा परिसरात राहतात आणि एकमेकांना ओळखतात. २०१२ मध्ये महेश आणि तरुणी एका केमिस्टच्या दुकानात सोबत काम करत होते. त्याच ठिकाणी या दोघांचे प्रेम जमले आणि त्यांच्यात शरीरसंबंधही आले. महेशने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवल्याचे तिचे म्हणणे आहे. ही बाब महेशने त्याचा प्लंबर मित्र बाळू याला सांगितली. त्यानंतर बाळूने या तरुणीला गाठून ‘महेश आणि तुझ्याबाबत मला समजले आहे, मी हे सगळ्यांना सांगेन, ज्याने तुझी बदनामी होईल’, अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीने गयावया करणाऱ्या तरुणीला त्याने स्वत:सोबतही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी या तरुणीवर अनेकदा बलात्कार केले.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार तरुणीला दोन वेळा गर्भपात करावा लागला. दरम्यान, महेशने पीडित तरुणीच्या तेवीस वर्षांच्या लहान बहिणीला फोन करून तिच्या मोठ्या बहिणीबाबत सांगून तुझीही तिच्या नावाने बदनामी करू अशी धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. हे ऐकून या मुलीने लगेचच पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.