Join us  

मुंंबईत गेल्या २४ तासांत घडलेल्या ३ दुर्घटनेत १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:39 PM

मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असून, गेल्या २४ तासांत मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटनांत तब्बल १५ जण जखमी झाले आहेत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असून, गेल्या २४ तासांत मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटनांत तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. कांदिवली येथील सिलिंडर स्फोटात ९ जण जखमी झाले असून, शताब्दी रुग्णालयात जखमीना  दाखल करण्यात आले आहे. वांद्रे येथील आगीत ६ जण जखमी झाले असून, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात ३ तर सायन रुग्णालयात ३ जणांना दाखल करण्यात आले. अंधेरी येथील आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटनाग्रस्त इमारत काचेची असल्याने घटनास्थळावरील आग विझविताना अग्निशमन दलास अनेक अडथळांना सामोरे जावे लागले.

कांदिवली पूर्वेकडील संभाजी नगर येथील जानुपाड्यातल्या गवारे चाळीतील संदिप नामदेव कानडे यांच्या घरात सिलिंडर लावताना झालेल्या स्फोटात ९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. शारदा नामदेव कानडे, संदीप नामदेव कानडे, ओंकार दत्तात्रय चीके, मेहुल सूरती, जयेश सुतार, दिवेश पटेल, राजेश रणछोड दुबला, निशांत तुषार पांचाळ आणि दिव्यानि सुरती अशी या दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत. या सर्व व्यक्ती २० ते २५ टक्के भाजल्या आहेत. घटनास्थळी ऊशिरापर्यंत कांदिवली फायर ब्रिगेडचे सिनियर स्टेशन आॅफिसर धांडे व स्टाफ उपस्थित होते.

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्वेकडील आंबेडकर नगरातील चाळ क्रमांक १० मधील खोली क्रमांक ७ मध्ये आग लागली. आगीत ६ जण जखमी झाले. सहापैकी तीन जणांना सायन तर तीन जणांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन रुग्णालयात नगमा बानू, नसरिन बानू आणि सक्रीन बानू तर भाभा रुग्णालयात नाझिया शेख, अलिया शेख आणि आयान शेख यांना दाखल करण्यात आले. नगमा ४०, नसरिन २५, सक्रीन २० आणि नाझिया १०, अलिया अडीच व आयान ५ टक्के भाजले आहेत. अलिया ४ वर्षांची तर आयान ६ वर्षांचा आहे. ही आग रात्री सातेवाजेपर्यंत विझविण्यात आली.

अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील अंधेरी एमआयडीसीमधल्या रोल्टा कंपनीच्या दुसºया मजल्यावरील सर्व्हर रुमला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. तोवर आग पसरत असतानाच आगीच्या ज्वाला आणि धूराने इमारतीला वेढले होते. आग शमविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच इमारतीसह लगतच्या परिसरात मोठया प्रमाणावर धूर पसरला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीमध्ये हवा खेळती राहण्यास वाव नव्हता. परिणामी अग्निशमन दलाच्या जवानांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. शिवाय आगीच्या ज्वाला मोठया असल्याने आग शमविण्यात अडथळे येत होते. येथील आग शमविण्यासाठी आवश्यक सर्व अशा अत्याधुनिक म्हणजे थर्मल इमॅगिंग कॅमेरा आणि उर्वरित साधनांचा उपयोग करण्यात आला. घटनास्थळी एकूण ११ फायर इंजिन आग विझविण्यासाठी कार्यरत होते. सदर इमारत काचेची असल्याने आग शमविताना अनेक अडथळे येत होते.

टॅग्स :आग