जयंत होवाळ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेला जबर धक्का बसला आहे. उद्धवसेनेचे प्रभाग समिती अध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे आणि दीपमाला बढे यांनी भाजप उमेदवाराच्या रकान्यात स्वाक्षरी केल्याने साहजिकच त्यांची मते अवैध ठरली आणि अध्यक्षपदाची माळ अलगद भाजपच्या गळ्यात पडली. भाजप उमेदवारासमोर स्वाक्षरी करणाऱ्या दोन्हीही नगरसेवकांना नोटीस बजावण्यात येणार आहे, असे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
एस (भांडुप) आणि टी (मुलुंड) प्रभाग समितीमध्ये सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि उद्धवसेना - त्यांचे मित्रपक्ष यांचे १०-१० नगरसेवक म्हणजेच समान संख्याबळ आहे. त्यामुळे पीठासीन अधिकारी चिठ्ठी टाकून अध्यक्षाची निवड करणार होते. एकूणच लॉटरी कुणाला लागणार हे त्या चिठ्ठीवर ठरणार होते. पण, चिठ्ठी टाकण्याची वेळच आली नाही. सुरेश शिंदे (प्रभाग १०९) आणि दीपमाला बढे (प्रभाग ११३) यांनी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या नावापुढील रकान्यात स्वाक्षरी केली. निकाल जाहीर झाला तेव्हा, दळवी यांना १०, तर उद्धवसेनेला ८ मते मिळाली. अर्थात उद्धवसेनेची दोन मते अवैध ठरल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे हादरून गेलेल्या उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी अवैध ठरलेल्या मतांबाबत पीठासीन अधिकारी - उपमहापौर संजय घाडी यांच्याकडे माहिती मागितली. मतदान गोपनीय असल्यामुळे नियमानुसार अशी माहिती देतात येत नाही. तरीही विरोधी पक्षाकडून मागणी झाल्याने माहिती देण्याचे निर्देश घाडी यांनी सचिव विभागाला दिले. त्यानंतर शिंदे आणि बढे यांचे मत अवैध ठरल्याचे उघड झाले.
तीन समित्या हातातून गेल्या; अवघ्या दोन ठिकाणी अध्यक्ष
गेली २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या उद्धवसेनेला १७पैकी फक्त दोन २ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. गंमत म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसलाही तेवढ्याच समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे.
आणखी तीन समित्या ताब्यात घेण्याची संधी उद्धवसेनेला होती. मात्र, एफ / दक्षिण समितीच्या निवडणुकीत समाजवादी आणि काँग्रेस नगरसेवक गैरहजर राहिल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा एका मताने पराभव झाला.
तर जी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उद्धवसेनेचे नगरसेवक असूनही ती मनसेकडे गेली आहे. कारण मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्यासाठी उद्धवसेनेचे जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर स्वाक्षरीच्या घोळामुळे एस आणि टी या समितीवर पाणी सोडावे लागले.
अनावधानाने झालेली चूक : सुरेश शिंदे
मी अध्यक्षपदाचा उमेदवार होतो. आम्ही सगळ्यांनी हात उंचावून दाखवले होते. मात्र, अनावधानाने भाजप उमेदवाराच्या नावासमोर स्वाक्षरी केली. एका डोळ्याने माझी दृष्टी अधू आहे. तसेच निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे मी थोडा गडबडून गेलो. मी गद्दार नाही, असे सुरेश शिंदे म्हणाले.
नजरचूक झाली : दीपमाला बढे
शिंदे व माझे नाव एका स्लिपवर आणि अन्य सदस्यांची नावे दुसऱ्या स्लिपवर होती. आधी शिंदे यांनी स्वाक्षरी केली. त्यांच्या नावाखाली माझे नाव होते, तिथे मी स्वाक्षरी केली. निकालानंतर चूक लक्षात आली. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाजू मांडली, असे दीपमाला बढे म्हणाल्या.
Web Summary : Uddhav Sena faced setback as two members mistakenly voted for BJP in ward committee elections. This resulted in BJP gaining control. Congress benefitted too. An inquiry is underway.
Web Summary : उद्धव सेना को झटका लगा क्योंकि दो सदस्यों ने वार्ड समिति चुनावों में गलती से भाजपा को वोट दे दिया। इससे भाजपा को नियंत्रण मिल गया। कांग्रेस को भी फायदा हुआ। जांच जारी है।