Join us  

जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 7:07 PM

जगभरात तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ईडली-डोसा मिळेल. पण, मराठी पदार्थ मिळतो का? तर नाही.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत, त्यामुळेच कलाकारांच्या कार्यक्रमाला ते आवर्जन हजेरी लावतात. तर, राज ठाकरे हे उत्तम खवैय्येही आहेत, हे आज एका कार्यक्रमातून दिसून आले. यावेळी, राज ठाकरेंनी मराठी पदार्थ आणि इतर देशातील पदार्थ यांची तुलना करताना आपल्याकडे एक चव नसल्याचे म्हटले. आपण, नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्नात आपलं एक वैशिष्ट गमावून बसलो आहोत, असेही त्यांनी म्हटले. 

जगभर पोहोचलेले आपल्याकडील केवळ दोनच लोकं आहेत. एक पंजाबी आणि दुसरे दाक्षिणात्य. जगभरात तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ईडली-डोसा मिळेल. पण, मराठी पदार्थ मिळतो का? तर नाही. कारण त्याला एक चव नाही, चौकटीत बसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले जातात. महाराष्ट्रातल्या सर्वच माता-भगिनींबाबत माझं एक म्हणणं आहे. मराठी, महाराष्ट्र बनून आपल्याला एकच काय ते आणता येईल, जे तुम्हाला जगभरात पोहोचवता येईल, असे राज यांनी म्हटले. दरम्यान, मराठी खाद्यपदार्थांच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर कुठे जातो? इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो. तिथे मिळणारा कुठला पदार्थ मराठी असतो? इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थ मोगलाई किंवा पंजाबी असतात. तिथे एकही पदार्थ मराठी नसतो, असा अनुभवही राज यांनी यावेळी व्यक्त केला. 

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आणि कलकी गृह उद्योग यांच्या वतीने आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महिला उद्योजकता मेळावा घेतला गेला. ह्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे, उद्योगपती विठ्ठल कामत आणि शर्मिला राज ठाकरे ह्या उपस्थित होत्या. सरचिटणीस शालिनी ठाकरे ह्यांच्या मार्गर्शनाखाली कलकी महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले मसाले, सरबत, ऊर्जा पीठ आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. तसंच पक्षाचे नेते श्री. दिलीप धोत्रे ह्यांच्या वतीने ५ महिलांना गृहउद्योगस मदत म्हणून घरगुती पिठाची चक्की देखील भेट देण्यात आली. ह्या सोहळ्याची क्षणचित्रं

सिंगापूरचा किस्सा 

मी एकदा सिंगापूरला गेलो होतो. ते सकाळी ९ वाजता उघडतं आणि रात्री ११ ला बंद होतो. त्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून जगातल्या प्रत्येक देशातला ब्रेक फास्ट मिळतो. तुम्ही फक्त नाव घ्या, ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मेक्सिकन नाव घ्या सगळ्या देशातले ब्रेक फास्ट मिळतात. पण इंडियन ब्रेक फास्ट मिळत नाही. का मिळत नाही? इडली द्यायची की पराठे द्यायचे की काय द्यायचं? हेच कळत नाही, असा किस्सा राज यांनी सांगितला.

मॅकडॉनल्डची जगभरात एकच चव

जगात कुठेही गेलात तर मॅक डोनाल्ड्सचा बर्गर खाताना एक चव लागते. त्याचा एक रिसर्च केलेला आहे. आपल्याकडे वडा-पावची चवही बदलते. आपल्याकडे मिसळीची चवही बदलते. आपण त्यावर असं सांगतो की आमच्याकडे दहा प्रकारच्या मिसळी मिळतात, कारण, आमच्याकडे विविधता आहे. त्या विविधतेच्या नावाखाली आपण बाहेर पोहचत नाही. जे जगभर पोहचलेले लोक आहेत त्यापैकी आपल्या देशातले फक्त पंजाबी आणि दाक्षिणात्य लोक आहेत ज्यांचे खाद्यपदार्थ हे बाहेरच्या देशातही खाल्ले जातात. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमराठी