मुंबई - मोनो रेल बंद पडल्यानंतर गाडीच्या काचा फोडून प्रवाशांची सुटका करावी लागलेल्या घटनेची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील त्रुटी उघड झाल्यानंतर सिग्नल व दूरसंचार विभागाचे मुख्य अभियंता मनीष सोनी आणि सुरक्षा व्यवस्थापक राजीव गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
मोनोरेल मार्गावर १९ ऑगस्टला गाडी बंद पडली होती. वडाळ्याकडून चेंबूरच्या दिशेने निघालेली असताना सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास मैसूर कॉलनी स्थानकाजवळ ती बंद पडली. दोन तास अडकून पडलेल्या प्रवाशांना अग्रिशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्याची वेळ महामुंबई मेट्रो संचलन मंडळावर आली होती. घटनेत गुदमरल्याने १६ प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला. त्यापैकी १३ प्रवाशांना ‘१०८’ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी घटनास्थळी उपचार करून घरी सोडले, तर ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एमएमआरडीएने या घटनेची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी घटनेच्या दिवशी प्रवाशांच्या सुटकेसाठी वापरण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीची (एसओपी) मंगळवारी तपासणी केली. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्याचे उघड झाले. आता मोनोच्या सुरक्षेची जबाबदारी एमएमआरडीएच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली.
बचाव मोहीम राबवण्यात अपयशी घटनेनंतर पोलीस आणि पालिका प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्रुटी राहिल्या. उपाययोजना राबविण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्याची असतानाही ते घटनास्थळी विलंबाने आले. मोनो स्थानकांच्या पाहणीतही सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्रुटी ठेवल्या. पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरले.
दुर्घटना टाळण्यासाठी... एमएमआरडीएने घटनेच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यात आयआयटी मुंबईतील तज्ज्ञ प्रा. हिमांशु बहिरट, सिडकोच्या मुख्य ट्रान्सपोर्ट प्लॅनर गीता पिल्लई, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त अस्तिक पांडे यांचा समावेश असेल. ही समिती भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक शिफारसी करेल.