Join us  

खड्ड्यामागे दोन लाख खर्च, तरीही मुंबईतील रस्ते खड्ड्यांत; पालिकेचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:20 AM

माहिती अधिकारातून उघड

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर पडलेला एक खड्डा भरण्यासाठी सुमारे १६ हजार ते दोन लाख रुपये खर्च केले जात असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनदेखील मुंबईतील प्रत्येक रस्ता हा खड्डेमय दिसत असल्याने, पालिकेच्या कारभाराविरोधात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत २,३३४ खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, एका खड्ड्यामागे तब्बल दोन लाख ३,९६६रुपये खर्च होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांना माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेनेच ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या खर्चाचे प्रमाण कमी झाले, तरी गेल्या वर्षीही एका खड्ड्यासाठी १६ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

शकील शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते ३१ जुलै, २०१९ पर्यंत खड्ड्यांबाबत २४ हजार १४६ आॅनलाइन तक्रारी आल्या. यापैकी २३ हजार ३८८ खड्डे भरले आहेत. तर १० जून ते १ आॅगस्ट, २०१९ पर्यंत २,६४८ खड्ड्यांपैकी २,३३४ खड्डे भरले असून, केवळ ४१४ खड्डे शिल्लक आहेत, तर १ एप्रिल, २०१९ ते ३१ जुलै, २०१९ पर्यंत खड्ड्यांसंदर्भात २६६१ तक्रारी आॅनलाइन प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २,४६२ खड्डे भरले असून, १९९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला जात आहे.कोट्यवधी रुपये गेले खड्ड्यांत

  • २०१३ ते २०१९ पर्यंत खड्डे भरण्यासाठी ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार हजार रुपये खर्च.
  • २०१३-१४ या वर्षात २,२६८ खड्डे भरण्यासाठी ४६ कोटी २५ लाख ९७ हजार रुपये खर्च. याप्रमाणे एक खड्डा भरण्यासाठी दोन लाख तीन हजार ९६६ रुपये खर्च झाले.
  • २०१४-१५ या वर्षात २,०९८ खड्डे भरण्यासाठी ३४ कोटी १६ लाख ९२ हजार रुपये खर्च केले आहे. एक खड्डा भरण्यासाठी एक लाख ६७ हजार ६३२ रुपये खर्च.
  • २०१५-१६ या वर्षात १,५८३ खड्डे भरण्यासाठी १० कोटी ६१ लाख २७ हजार रुपये खर्च. एक खड्डा भरण्यासाठी ६७ हजार ४१ रुपये खर्च.
  • २०१६-१७ या वर्षात ६,०९८ खड्डे भरण्यासाठी सहा कोटी ९४ लाख ९७ हजार रुपये खर्च. एक खड्डा भरण्यासाठी ११ हजार ३९६ रुपये खर्च
  • २०१७-२०१८ मध्ये खड्डे भरण्यासाठी सात कोटी ७३ लाख २२ हजार रुपये खर्च. एक खड्डा भरण्यासाठी १९ हजार ४१७ रुपये खर्च
  • २०१८-१९ या वर्षात ४,८९८ खड्डे भरण्यासाठी सात कोटी ९८ लाख सात रुपये. एक खड्डा भरण्यासाठी १६ हजार २९२ रुपये खर्च.

 

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला होता. त्यानुसार, मोठे पॅकेज रस्त्यांच्या कामासाठी जाहीर करण्यात आले. मात्र, रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचेही काही वर्षांपूर्वी उजेडात आले. काही ठिकाणी एकच खड्डा वारंवार भरला जात असून, खड्डा भरण्याचा सरासरी खर्च तब्बल दोन लाख रुपये असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

टॅग्स :खड्डेमुंबई महानगरपालिका