वेळेत एसी कार न देणाऱ्या व्यावसायिकाला दोन लाखाचा दंड
By Admin | Updated: September 26, 2014 00:54 IST2014-09-26T00:54:04+5:302014-09-26T00:54:04+5:30
पूर्ण रक्कम स्वीकारूनही एसी कारचा ताबा न देणाऱ्या जसप्रीत सिंग चड्डा या व्यावसायिकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे

वेळेत एसी कार न देणाऱ्या व्यावसायिकाला दोन लाखाचा दंड
ठाणे: संपूर्ण रक्कम स्वीकारूनही एसी कारचा ताबा न देणाऱ्या जसप्रीत सिंग चड्डा या व्यावसायिकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच आदेशापासून ३० दिवसांत त्या एसी कारचा ताबा द्यावा, अन्यथा त्यासाठी घेतलेले २ लाख ८५ हजार परत करावेत, असेही मंचाने सांगितले आहे.
भार्इंदर येथे राहणारे ब्रायन रॉड्रिक्स यांनी तेथील जसप्रीत सिंग चड्डा यांच्याकडे सप्टेंबर २००९ मध्ये दोन ह्युंडाई सॅण्ट्रो कार खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक विदाऊट एअर कंडिशन तर दुसरी एअर कंडिशन आणि पॉवर स्टेअरिंगची होती. यापैकी एक कार चड्डा यांनी सप्टेंबर २००९ मध्येच दिली. परंतु, दुसरी एसी कार दिली नाही. त्या एसी कारसाठी ब्रायन यांनी १५ सप्टेंबर २००९ रोजी २ लाख ८५ हजार चेकने दिले होते.
परंतु, पैसे घेतल्यावर दोन महिन्यांनंतरही एसी कार दिली नाही. त्यामुळे ब्रायन यांनी अखेर विदाऊट एसी कार ४ डिसेंबर २००९ ला परत करून एसी कारची मागणी केली. अखेर, जून २०१० मध्ये पुन्हा एसी कारची चौकशी केली असता एक आठवड्यात एसी कार देऊ, असे जसप्रीत यांनी सांगितले. यासाठी २ लाख १५ हजार वाहन कर्ज घेतले असून त्यानुसार दर महिन्याला ४ हजार ७८३ हप्ता भरत आहोत. त्यामुळे संपूर्ण रक्कम घेऊनही एसी कारचा ताबा न देणाऱ्या जसप्रीत यांच्याविरोधात ब्रायन यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून कारचा ताबा तसेच नुकसानभरपाईची मागणी केली. याबाबत जसप्रीत यांनी नोटीस मिळाल्यावरही आपली बाजू स्पष्ट केली नाही. घटना, कागदपत्रे यांचा विचार करून एसी कारसाठी ब्रायन यांनी १५ सप्टेंबरलाच २ लाख ८५ हजार चेकने दिले आहेत.
त्यामुळे ब्रायन यांनी वाहनाची संपूर्ण रक्कम दिल्यावर आणि दिलेल्या कालावधीपेक्षा अधिक वाट पाहूनही जसप्रीत यांनी एसी कारचा ताबा दिला नसल्याचे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे जसप्रीत यांनी नुकसानभरपाई म्हणून २ लाख देण्याचे तसेच ३० दिवसांत एसी कारचा ताबा अन्यथा त्यासाठी घेतलेली २ लाख ८५ हजार रक्कम परत करण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)