Join us  

रेल्वेच्या डब्यात सापडला दोन लाख ६६ हजारांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:27 PM

वांद्रे रेल्वे पोलिसांची कामगिरी; रोख रक्कम, दागिने केले परत

मुंबई : वांद्रे टर्मिनल येथे आलेल्या भुज वांद्रे एसी डब्यात एक प्रवासी आपली बॅग विसरून गेला होता. रेल्वेच्या डब्यात रेल्वेपोलिसांना ती बॅग सापडली. त्यात दोन लाख ६६ हजार रूपयांचा ऐवज आढळून आला. यामध्ये रोख रक्कम आणि दागिन्यांचा समावेश होता.वांद्रे रेल्वे पोलिसांना पाऊचमध्ये मंगळसूत्र, चैन, तीन अंगठ्या, दोन बांगड्या, मोर वेल, ब्रेस्लेट या सोन्याच्या वस्तू सापडल्या. चांदीचा कडा, मोबाइल फोन आणि पैशाचे पाकीट त्यात सहा हजार २०० रुपयांची रोख रक्कम, अशी एकूण दोन लाख ६६ हजार २०० रुपयांचा ऐवज असलेली बॅग कर्तव्यदक्ष रेल्वे पोलिसांना सापडली.बॅगेमधून बोरीवली येथे राहणारा श्रेयस आचार्य (३५) याची ओळख पटली. रेल्वे पोलिसांनी श्रेयस यांना बोलावून बॅगमधील मालमत्ता त्याचीच आहे का? याची शहानिशा केली. बॅग श्रेयस यांची असल्याचे समजल्यावर रेल्वे पोलिसांनी दागिन्याने व रोख रक्कमेने भरलेली बॅग त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती वांद्रेतील वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली.

टॅग्स :रेल्वेपोलिस