देशभरातील दोनशे अन्न तंत्रज्ञ सहभागी
By Admin | Updated: March 3, 2015 01:41 IST2015-03-03T01:41:56+5:302015-03-03T01:41:56+5:30
परभणीच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दहाव्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा पवई येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटर येथे नुकताच पार पडला.

देशभरातील दोनशे अन्न तंत्रज्ञ सहभागी
मुंबई: परभणीच्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दहाव्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा पवई येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटर येथे नुकताच पार पडला. यात देशातील दोनशेहून अधिक अन्न तंत्रज्ञ सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक उन्नतीसाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने ‘अन्न तंत्रज्ञानातून मेक इन इंडियाचे सबलीकरण’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
तांत्रिक सत्रासाठी गिरीष पै व आनंद चोरडिया उपस्थित होते. हरपालसिंग यांनी पाकशास्त्र व अन्नविज्ञानाच्या संगमातून चवदार भारतीय अन्नपदार्थ तयार करून जगभरात पसरविण्याबाबत विचार मांडले. पै यांनी परंपरागत पद्धती व तंत्रज्ञान एकत्र आणून उत्पादन क्षमता कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उद्योगात असलेल्या मर्यादा व संधी त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
दुपारच्या सत्रात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेली महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या स्थितीबाबत तयार केलेली श्वेतपत्रिका देसाई यांना सादर केली. त्याचा अभ्यास करुन यातील सूचनांचा नक्कीच विचार करुन बदल घडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)