बॉलीवूडमध्ये पडले दोन गट

By Admin | Updated: February 6, 2015 01:02 IST2015-02-06T01:02:50+5:302015-02-06T01:02:50+5:30

गेल्या आठवड्यात इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या एआयबी नॉकआउट या व्हिडीओत आजच्या लोकप्रिय कलाकारांनी वापरलेल्या अश्लील भाषेमुळे एकच गोंधळ उडाला.

Two groups fell into Bollywood | बॉलीवूडमध्ये पडले दोन गट

बॉलीवूडमध्ये पडले दोन गट

अनुज अलंकार ल्ल मुंबई
गेल्या आठवड्यात इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या एआयबी नॉकआउट या व्हिडीओत आजच्या लोकप्रिय कलाकारांनी वापरलेल्या अश्लील भाषेमुळे एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमावरून नैतिकतेबाबत वाद सुरू झाला असून, बॉलीवूडमध्ये कार्यक्रमाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडले आहेत.
आधुनिकतेकडे वळलेल्या काही कलाकार, निर्मात्यांनी ही आजच्या काळानुसार बदललेली संस्कृती म्हणत या कार्यक्रमाची बाजू घेतली आहे; तर अनेकांनी कार्यक्रमातल्या अश्लील भाषेवरच आक्षेप घेत विरोध केला आहे. मुख्य म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्सवरही यावर वाद रंगला आहे. तर या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हाही उपस्थित राहिल्याने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचे समजते.
या कार्यक्रमाबाबत विविध मतांतरे ऐकायला मिळत आहेत. करण जोहरच्या जवळचा मित्र आणि दिग्दर्शकाने तर याबाबतीत इतका वाद होण्याचे काहीच कारण नसल्याचे म्हटले. हा एक प्रकारे खासगी कार्यक्रम होता आणि त्याच सहजतेने तो स्वीकारला जाणे आवश्यक असल्याचेही त्याने म्हटले. अशा प्रकारचे कार्यक्रम परदेशात सर्रास होत असून, तरुणाई त्याचा मनसोक्त आनंद लुटते. भारतात हा प्रकार नवा असला तरी या कार्यक्रमाने आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात तरुणाईच्या भावना आहेत आणि तरुणाईला आपल्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही या दिग्दर्शकाने स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला समर्थन देणाऱ्या एका कलाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि इतर शहरांत सेक्स कॉमेडीसारखे कार्यक्रम होत असून, ते बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे. ज्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम आवडत नाहीत त्यांनी ते बघू नयेत हे खरे असले तरी ज्यांना बघायचे आहेत त्यांना विरोध का करायचा हे मात्र समजत नाही, असेही तो म्हणाला. तसेच हा कार्यक्रम युट्यूबवर अपलोड झाल्यानंतर १२ तासांच्या आत १० लाख लोकांनी त्याला पसंती दिली, यावरून कार्यक्रमाची लोकप्रियता सिद्ध होते, असेही त्याने सांगितले.
तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि चित्रपटकर्ते अशोक पंडित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कार्यक्रमाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कार्यक्रमात सलमानची बहीण अर्पितावर काही अश्लील टिपण्या करण्यात आल्याने सलमान खानसुद्धा या कार्यक्रमावर भडकला असल्याच्या बातम्या आहेत. तसेच अनेक जण उघडपणे विरोध करण्यास धजावत नसले तरी त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणे अक्षरक्ष: टाळले आहे.
एका दिग्दर्शकाने या कार्यक्रमाने अश्लीलतेचा कळस गाठल्याचे म्हटले आहे. जे कलाकार सहभागी झाले होते ते अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्याकडून अशा खालच्या पातळीची अपेक्षा कोणीही करणार नाही; तर खासगीपणाबाबत ते म्हणाले की, खासगी पार्ट्यांमध्ये आजकाल अनेक गोष्टी सर्रास घडतात. पण अशा कार्यक्रमात आणि तेही इतक्या महिलांच्या उपस्थितीत असा तमाशा करणे खरेच लज्जास्पद आहे.

या कार्यक्रमाला सोनाक्षी सिन्हा उपस्थित राहिल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा तिच्यावर खूप नाराज आहेत. सिन्हा कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, शत्रुघ्न यांनी सोनाक्षीला भविष्यात अशा कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सोनाक्षीने नुकत्याच केलेल्या टिष्ट्वटनुसार, या कार्यक्रमाला समर्थन देतानाच मला इतरांनी सल्ला देऊ नये, असेही ठणकावले आहे.

Web Title: Two groups fell into Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.