सराफाचा कारखाना लुटणारे दोघे गजाआड

By Admin | Updated: July 13, 2015 23:35 IST2015-07-13T23:35:27+5:302015-07-13T23:35:27+5:30

सोनाराच्या कारखान्यातून लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या त्रिकूटापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले आहे.

The two gaadas who lost the jewelery factory | सराफाचा कारखाना लुटणारे दोघे गजाआड

सराफाचा कारखाना लुटणारे दोघे गजाआड

मुंबई : सोनाराच्या कारखान्यातून लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या त्रिकूटापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले आहे. रहीम सलीम शेख ऊर्फ बबन (२५), सूरज रघुराम हेगडे (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून तब्बल १४ लाख ८५ हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पायधुनी परिसरात एप्रिल महिन्यात सराफाच्या कारखान्यातून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक सुनील कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. कारखान्यात दागिने ठेवण्याच्या जागेतूनच चोरी झाल्याने यात जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होताच. दागिने ठेवण्याची जागा सराफाबरोबर त्याच्या कामगारांंना माहीत होती. त्यानुसार कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर काम सोडून गेलेले तसेच कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. काम सोडून गेलेल्या १० कर्मचाऱ्यांमध्ये शेख याचाही समावेश होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी त्याला पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील काम सोडल्यानंतर शेख दहिसर येथे राहण्यास गेला. तेथे त्याची भेट हेगडेशी झाली. हेगडे हा किरकोळ चोऱ्या करतो. शेखने त्याला कारखान्याबाबत माहिती दिली. हाती घबाड लागल्याने शेख आणि हेगडेसह त्याच्या आणखी एका मित्राने कारखान्यात चोरी करण्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले. आरोपींकडून तब्बल १४ लाख ८५ हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. यात ५५० गॅ्रम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The two gaadas who lost the jewelery factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.