Join us  

उंबरवाडीतील दोन कुटुंबांना गावाने टाकले वाळीत; पाली पोलीस ठाण्यात २३ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 4:06 AM

सुधागड तालुक्यातील उंबरवाडी येथील निवृत्त पोलीस कर्मचारी हाशा नामा हंबीर आणि मांगे या दोन कुटुंबांना गावाने वाळीत टाकले आहे.

नागोठणे : सुधागड तालुक्यातील उंबरवाडी येथील निवृत्त पोलीस कर्मचारी हाशा नामा हंबीर आणि मांगे या दोन कुटुंबांना गावाने वाळीत टाकले आहे. या प्रकरणात आमच्याच गावातील ठाकूर समाजाचे सुधागड तालुका अध्यक्ष यशवंत हिरू हंबीर आणि गाव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत कृष्णा वारगुडे यांचीच भूमिका संशयास्पद असून, त्यामुळेच आम्हाला न्याय मिळत नसल्याचा आरोप हंबीर यांनी केला आहे. पाली पोलीस ठाण्यात या प्रकरणात या दोन व्यक्तींसह इतर २३ जणांवर गुन्हा दाखल केला असल्याने पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, या प्रकरणाची चौकशी चालू असून कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस खात्यात ३६ वर्षे सेवा करून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले हाशा हंबीर आपल्या कुटुंबीयांसह उंबरवाडी या आपल्या मूळ गावी राहत आहेत. उंबरवाडी हे गाव राबगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असून, गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत गावपातळीवर झालेल्या बैठकीत सरपंच निवडीसाठी एका विशिष्ट उमेदवाराला निवडून देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता. पण ठरवलेल्या उमेदवाराऐवजी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मते दिल्याने ठरलेला उमेदवार पराभूत झाला. ठरलेल्या व्यक्तीला मत न दिल्याचा राग मनात धरून माझ्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आले असल्याचे हंबीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. हंबीर हे रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजाचे पहिले पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जातात.

हंबीर यांची मुलगी पिंकी संदीप मांगे हिचे सासरसुद्धा याच गावात आहे. माझी मुलगी म्हणून तिच्या कुटुंबालाही वाळीत टाकण्यात आले असल्याचे हंबीर यांनी या वेळी स्पष्ट केले. पिंकी मांगे हिचे गावात किरकोळ खाऊ विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कोणीही जाऊ नये, तसेच मोठे बंधू यांच्या पिठाच्या चक्कीत दळण घेऊन जाऊ नये, माझ्या कुटुंबातील कोणाशीही बोलू नये, कोणत्याही प्रकारची आर्थिक अथवा श्रमदानाची मदत करू नये, अशा प्रकारे गावपंचायतीने राज्यघटनेच्या विरुद्ध येथील गावपंचांनी बहिष्कार ठेवून दीड वर्षे आमच्यावर अन्यायच केला असल्याची भावना हंबीर यांनी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत गावकऱ्यांची बाजू समजू शकली नाही.

पीडित कुटुंबातील विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न!

गावपंचायतीच्या त्रासाला कंटाळून पिंकी मांगे हिने ४ नोव्हेंबरला विष प्राशन करून अत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला तातडीने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याने तिचा जीव वाचला होता. ती शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी तिचा जबाब नोंद करून पंच आणि ग्रामस्थांविरुद्ध गुन्हासुद्धा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात सुधागडचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच गटविकास अधिकारी यांनी उंबरवाडीत येऊन तोंडी चौकशी केली होती. तालुका अध्यक्ष यशवंत हंबीर आणि गाव अध्यक्ष चंद्रकांत वारगुडे यांच्यासह एकूण २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी त्यांच्याविरोधात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने याला काहीतरी राजकीय गंध येत असल्याचा आरोप हाशा हंबीर यांनी केला.

निवेदनाद्वारे वेधले लक्ष! : आम्हाला न्याय मिळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, अलिबाग यांच्यासह राज्य महिला आयोग, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांचेसुद्धा निवेदनाद्वारे लक्ष वेधले असल्याचे हंबीर यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :पोलिसअटक