Join us  

'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही'; नाना पटोले यांचं वक्तव्य

By मुकेश चव्हाण | Published: December 04, 2020 2:02 PM

नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

मुंबई/पंढरपूर:  कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर असं दोन दिवसांचंच घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नसल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

सध्या कोरानाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. प्रश्न मार्गी लागावे यासाठी लोक आंदोलन करतात. यामुळे कोरानाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले हे आज पंढरपुरात आले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

कोरोनाच्या काळातील निर्बंधांचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच विधिमंडळाच्या अधिवेशनालाही बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे वर्षभरात तिसऱ्या अधिवेशनाला थोडक्यात आटोपावे लागत आहे. मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर आटोपावे लागले होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते. अखेरीस सप्टेंबरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपावे लागले होते.

केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा-

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजूरांच्या विरोधात केंद्र सरकारने कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेती संबंधित कामगार यांच्या विरोधात विधेयक पास करून सर्व सामान्य शेतकऱ्याची गळचेपी करणारे विधेयक आहे. यामुळे सर्व देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याच्या अनुशंगाने जे दिल्लीमध्ये सर्व राज्यातून शेतकरी वर्ग जमा झाला आहे. सध्या दिल्लीत खूप थंडी आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :नाना पटोलेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारविधानसभा हिवाळी अधिवेशन