शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पात दोन कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:09 AM2021-02-21T04:09:28+5:302021-02-21T04:09:28+5:30

धूळमुक्त, हिरवेगार पार्क तयार करण्यावरच भर; प्रकल्पासाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या ...

Two crore reduction in Shivaji Park renovation project | शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पात दोन कोटींची कपात

शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पात दोन कोटींची कपात

Next

धूळमुक्त, हिरवेगार पार्क तयार करण्यावरच भर; प्रकल्पासाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करणार आहे. या मैदानावर केवळ क्रिकेट नव्हे, तर जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, स्केटिंग, अशा खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, आता या प्रकल्पाच्या खर्चात दोन कोटींची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे धूळमुक्त आणि हिरवेगार शिवाजी पार्क तयार करण्यावरच आता भर देण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर राजकीय सभा, विविध खेळ, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. ज्येष्ठ नागरिक येथे नियमित फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, या मैदानावरील धुळीचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिक पालिकेकडे अनेक वेळा करीत आहेत. हा त्रास टाळण्यासाठी पाण्याचा शिडकाव करणारे यंत्र येथे बसवले; परंतु पुरेशा पाण्याअभावी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे धूळमुक्त शिवाजी पार्क आणि विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला.

या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ चार कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे फुटबॉल, दोन बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग, खो-खो, कबड्डी आदीचे कोर्ट, जॉगर्स ट्रॅक, नानानानी पार्क, अशा काही योजनांमध्ये कपात करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शिवाजी पार्क परिसर हिरवागार व धूळमुक्त ठेवण्यासाठी पाण्याचा शिडकावा करणारे यंत्र आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली जाणार आहे.,

* अन्य खेळांसाठीही हाेणार जागा उपलब्ध

- ९८ हजार २४३ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शिवाजी पार्कवर क्रिकेटसाठी आठ खेळपट्टी आहेत. नवीन आराखड्यानुसार अन्य खेळांसाठीही जागा उपलब्ध करण्यात येणार होती.

- मैदानातील ३१ टक्के जागा खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या जागेत सामाजिक व राजकीय मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन सहज होऊ शकेल. यामध्ये दोन लाख लोक बसतील, एवढी जागा उपलब्ध असणार आहे.

Web Title: Two crore reduction in Shivaji Park renovation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.