वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचे दोन गुन्हे दाखल
By Admin | Updated: May 9, 2014 03:20 IST2014-05-09T03:20:33+5:302014-05-09T03:20:33+5:30
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मेढसिंग याच्याविरोधात दोन महिलांनी केलेल्या तक्रारींवरून बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचे दोन गुन्हे दाखल
मुंबई : मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मेढसिंग याच्याविरोधात दोन महिलांनी केलेल्या तक्रारींवरून बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दहिसर आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेढसिंग हा सध्या हत्यारी विभागात वरिष्ठ निरीक्षक आहे. बारा वर्षांपूर्वी रवींद्र मेढसिंग हा दहिसर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना एका पीडित महिलेने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या गुन्ह्याचा तपास मेढसिंग करत असताना ती त्यांच्या संपर्कात होती. काही काळाने पीडित महिलेचा पतीसोबत समेट झाला. दरम्यानच्या काळात मेढसिंगने त्या महिलेच्या घरी आणि नॅशनल पार्कमध्ये अनेकदा तिच्याशी शारीरिकसंबंध ठेवले होते. मेढसिंग याने तिच्या पतीला पत्नीच्या चारित्र्याची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याच्यासमोर विनयभंग व अश्लील वर्तन केले होते. त्याचबरोबर पीडित महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ करीत पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली होती, असा आरोप आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर दहिसर पोलीस ठाण्यात मेढसिंगविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात दुसर्या एका ३१ वर्षीय महिलेने मेढसिंगविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मेढसिंगने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची तिची तक्रार आहे. मेढसिंग विवाहित असतानाही आपल्याशी लग्न केले. त्यानंतर गरोदर असताना गर्भपात करण्यास भाग पाडले. ती बाब मेढसिंगची पत्नी आणि मुलाला कळताच त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मेढसिंग व त्याच्या कुटुंबाकडून होणार्या छळाला कंटाळून पीडित महिलेने क्राइम ब्रँचच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात मेढसिंग, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तिघांविरोधात गुन्हा नोंदवून आझाद मैदान पोलिसांनी हा गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात वर्ग केला. (प्रतिनिधी)