Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएफचे पैसे मिळविण्यात दोन जन्मतारखांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी शिथिल, आॅनलाईन अर्ज आणि तीन वर्षांचा फरक ग्राह्य

 

मुंबई - लॉकडाऊनमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमधून काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली असली तरी अनेक कर्मचा-यांची आधार कार्ड आणि पीएफ कार्यालयांत नोंदविलेली जन्मतारीख वेगवेगळी असल्याने त्यांची योजनेचा फायदा मिळू शकत नाही. ही कोंडी फोडण्यासाठी जन्मतारखेतला फरक जर तीन वर्षांपेक्षा कमी असेल तर आॅनलाईन अर्जाव्दारे त्यात सुधारणा करण्याचे आदेश पीएफ कार्यालयाने जारी केले आहेत. 

भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचा-यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा देणारा आदेश केंद्रिय कामगार मंत्रालयाने जारी केला आहे. हे पैसे मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी आधार कार्डवर नोंदविलेली तारीख अधिकृत समजली जाते. परंतु, अनेक कर्मचा-यांची पीएफ कार्यालयात केवायसी अद्ययावत केलेले नाहीत. तिथे नोंदविलेली जन्मतारीख आणि आधार कार्डवरील जन्मतारीख वेगळी आहे. अनेक आधारकार्डवर तर केवळ महिना आणि वर्ष असाच उल्लेख आहे. त्यावर जन्मतारीखच नाही. त्यामुळे अर्ज करून पैसे मिळविण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

जन्मतारखेतला फरक जर एक वर्षांचा असेल तर पीएफ कार्यालयात अर्ज आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करून बदल करावा लागत होता. परंतु, कोरोनाच्या संकटात तसा बदल करणे आता शक्य नाही. त्यामुळे जन्म तारखेतली तफावत तीन वर्षांपर्यंत असेल तरी आॅनलाईन अर्जाव्दारे बदल करण्याची मुभा अर्जदारांना देण्यात आली आहे. तसे अर्ज आल्यानंतर त्यात तातडीने बदल करण्याचे आदेश संबंधित कर्मचा-यांना देण्यात आले आहेत. तसेच, कोरोनामुळे अनेक कर्मचारी आर्थिक संकटात असून त्यांनी केलेल्या विनंतीनुसार देणी तातडीने अदा करावीत अशा सुचनाही केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. हे पैसे आॅनलाईन ट्रान्सफर होणार असून यंत्रणा नवी असल्याने त्यासाठी थोडा विलंब होत असल्याचे ठाणे पीएफ कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस