Join us

दोन बांगलादेशींना रोखले विमानतळावर; बौद्ध भिक्षूंच्या वेषात निघाले होते थायलंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 05:22 IST

बौद्ध भिक्षूंच्या वेषात थायलंड येथे फिरायला निघालेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले.

मुंबई : बौद्ध भिक्षूंच्या वेषात थायलंड येथे फिरायला निघालेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले. या दोघांविरोधात भारतीय गुप्तचर संस्थेचे (आयबी) इमिग्रेशन काउंटर अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याने तक्रार दिल्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार लक्ष्मीशंकर मीना (३५) हे आयबीतर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या इमिग्रेशन काउंटरवर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अशोक रॉय (२७) नावाच्या व्यक्तीचा पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि थायलंड टूरिस्ट व्हिसा त्यांच्याकडे तपासणीसाठी आला. प्रवाशाने तो बौद्ध भिक्षुक असून फिरण्यासाठी थायलंडला निघाल्याचे मीना यांना सांगितले. मात्र, संशय आल्याने त्याला मीना यांनी तपासणीसाठी विंग इन्चार्ज आर. के. साहू यांच्याकडे सोपवले. मीना यांचे सहकारी ज्ञानेश्वर भुजबळ यांच्याकडे मोहित शर्मा (२९) नावाने पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे तपासासाठी आली होती. त्याचाही पत्ता पुण्याचा असून जन्मस्थान मात्र उत्तर प्रदेश असे नमूद होते. शर्मा यानेही बौद्ध भिक्षू असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशीत रॉय आणि शर्मा दोघेही बांगलादेशी असून त्यांची खरी नावे ही सोंपत बरुआ आणि इमोन बरूआ अशी असल्याचे उघड झाले. त्यांनी खोटी आणि चुकीची माहिती कोलकाता आणि पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयाला देत गैरमार्गाने भारतीय पासपोर्ट मिळवून दोघेही थायलंडला निघाले होते. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. चौकशीत दोघेही मूळचे बांगलादेशमधील भिक्षुकच असून छळाला कंटाळून तिथून थायलंडमध्ये शरणागतीसाठी जात असल्याचे उघड झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

असे बनवले भारतीय पासपोर्ट!

 सोंपत याने अज्ञात एजंटकडून भारतीय ओळखपत्र मिळवले व कोलकाता पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट बनवत २०२१ मध्ये एजंटच्या मदतीने त्रिपुरामार्गे भारतात प्रवेश मिळवत कोलकत्ता येथे स्थायिक झाला.

 तर आरोपी इमोन २०१३ ला त्रिपुरामध्ये नातेवाइकांकडे राहून त्याने स्थानिक एजंटकडून भारतीय ओळखपत्र मिळवले.

  नंतर पुण्यात दाखल होत संतोष चक्रवर्ती नावाच्या एजंटकडून भारतीय पासपोर्ट मिळवला.