चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

By Admin | Updated: May 28, 2014 01:23 IST2014-05-28T01:23:22+5:302014-05-28T01:23:22+5:30

परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यावसायिकाला चार लाख रुपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली.

The two arrested for four lakhs of rupees were arrested | चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

मुंबई : परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यावसायिकाला चार लाख रुपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. यात एक आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली. भारतामध्ये न मिळणार्‍या मोटारसायकल परदेशातून मागवून देण्याचे आमिष दाखवत ही टोळी वेबसाइटच्या आधारे ग्राहकांसोबत संपर्क साधत होती. बोरीवलीत राहणारे व्यावसायिक नितीन देसाई यांनाही एक विदेशी मोटारसायकल खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी या वेबसाइटवर जाऊन त्यावर असलेल्या एका क्रमांकावर फोन केला. फोन केलेल्या इसमाने एका बँक खात्याचा क्रमांक देऊन त्यात चार लाख जमा करण्यास सांगितले. त्यानुसार देसाई यांनी त्या खात्यामध्ये पैसे जमा केले. मात्र पैसे देऊन दोन महिने उलटले तरी मोटारसायकल येत नसल्याने त्यांनी त्या इसमाला अनेकदा फोन केले. काही दिवसांनंतर तर आरोपीचा फोन बंद झाल्याने देसाई यांनी याबाबत गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या अधिकार्‍यांनी रविवारी बोरिवली येथून दिलशाद मन्सुरी आणि अब्दुल गफार या दोघा आरोपींना अटक केली. पोलिसांनी या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून काही बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट, दहा मोबाइल आणि बँकांचे पासबुक आणि एटीएम कार्ड जप्त केले. पोलिसांनी त्यांच्या चौकशीत ही टोळी अनेक वर्षांपासून अशा प्रकारे लोकांना फसवत असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीमध्ये नायजेरियन नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The two arrested for four lakhs of rupees were arrested