महा कृषी ऊर्जा अभियानासाठी दोन ॲप आणि दोन पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:26+5:302021-02-05T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प ...

महा कृषी ऊर्जा अभियानासाठी दोन ॲप आणि दोन पोर्टल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास गती देण्यासाठी कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले गेले. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणा अंतर्गत महा कृषी ऊर्जा अभियानाला सुरुवात झाली असून, अंमलबजावणीसाठी महावितरणने महा कृषी अभियान ॲप, एसीएफ ॲप, सौर ऊर्जा लॅण्ड बँक पोर्टल, महा कृषी अभियान धोरण २०२० पोर्टल आदींची निर्मिती केली आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोबत ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीत जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. कृषिपंप नवीन वीजजोडणी, थकबाकीमध्ये सवलत, इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती केली आहे. ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाइनद्वारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या वेबसाइटवर या वेबपोर्टलची लिंक देण्यात आली आहे.