अडीच कोटींची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरला अटक
By Admin | Updated: October 6, 2016 04:07 IST2016-10-06T04:07:46+5:302016-10-06T04:07:46+5:30
हॉस्पिटल विक्रीच्या नावाखाली डॉक्टर महिलेला अडीच कोटींचा चुना लावल्याप्रकरणी डॉ. कीर्तिकुमार शहा (६३) याला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

अडीच कोटींची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरला अटक
मुंबई : हॉस्पिटल विक्रीच्या नावाखाली डॉक्टर महिलेला अडीच कोटींचा चुना लावल्याप्रकरणी डॉ. कीर्तिकुमार शहा (६३) याला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. ज्योत्स्ना दीपक पटेल यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. शहा यांनी पटेल दाम्पत्याला कांदिवली पश्चिमेकडील एस.व्ही. रोड परिसरात ‘प्रतीक हॉस्पिटल अॅण्ड मॅटर्निटी होम’ विकायचे असल्याबाबत सांगितले होते. रुग्णालय विक्रीच्या नावाखाली शहा याने पटेल दाम्पत्याकडून २ कोटी ४५ लाख रुपये उकळले. मात्र पैसे देऊनही शहा यांनी रुग्णालयाचा व्यवहार पूर्ण केला नाही. त्यामुळे यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी २०१४ मध्ये कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी आॅक्टोबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेतही शहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी फसवणुकीच्या गुन्ह्यात शहाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. (प्रतिनिधी)