शिवसेना-भाजपात ट्विटर युद्ध
By Admin | Updated: July 4, 2015 01:40 IST2015-07-04T01:40:58+5:302015-07-04T01:40:58+5:30
मुंबईत एलईडी दिवे लावण्यावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुरू असलेले ट्विटर युद्ध पुन्हा रंगात आले आहे़ मरिन ड्राइव्हवर जुने दिवेच चांगले असल्याचे मत मुंबई

शिवसेना-भाजपात ट्विटर युद्ध
मुंबई : मुंबईत एलईडी दिवे लावण्यावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुरू असलेले ट्विटर युद्ध पुन्हा रंगात आले आहे़ मरिन ड्राइव्हवर जुने दिवेच चांगले असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले़ हीच संधी साधून युवासेना प्रमुखांनी एलईडी दिव्यांऐवजी पदपथावर सोडियम व्हेपरचे दिवे लावण्याची मागणी केली आहे़ त्यास न्यायमूर्तींचा हा आदेश नसून केवळ मत असल्याचे प्रत्युत्तर भाजपाने टिष्ट्वटरच्या माध्यमातून दिले आहे़
मुंबईतील वाहतूक समस्येबाबतच्या जनहित याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाच्या परिषद सभागृहात नुकतीच झाली़ या सुनावणीदरम्यान मुख्य न्या. मोहित शहा यांनी पदपथांवर सोडियम व्हेपरचे दिवे चांगले असल्याचे मत व्यक्त केले़ न्यायमूर्तींच्या या मताचे भांडवल करीत शिवसेनेने एलईडी दिव्यांविरोधात पुन्हा एकदा बंड पुकारले आहे़ सोडियम व्हेपरच्या दिव्यांमुळे राणीच्या कंठहाराला सोनेरी मुलामा चढणार असल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टिष्ट्वटरवरून लगावला आहे़
यास भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी टिष्ट्वटरद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे़ न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करायला हवा़ परंतु मुख्य न्यायमूर्तींनी निव्वळ आपले मत व्यक्त केले आहे़ संपूर्ण मुंबईत एलईडी पथदिवे बसविण्यात यावे, असेही मत यापूर्वी न्यायालयाने व्यक्त केले असल्याचे अॅड़ शेलार यांनी ठाकरे यांना स्मरण करून दिले आहे़ त्यामुळे एलईडी पथदिव्यांवरून युतीमध्ये पुन्हा टिष्ट्वटर वाद पेटला आहे़ (प्रतिनिधी)
एलईडी की सोडियम व्हेपर ?
मुंबईतील १ लाख ३२ हजार दिवे बदलून त्या ठिकाणी नवीन एलईडी दिवे बसविण्याचा केंद्राचा प्रकल्प आहे़
या प्रकल्पासाठी होणारा अडीचशे कोटींचा खर्च कालांतराने पालिकेच्या तिजोरीतून लाटण्यात येणार आहे़
या प्रकल्पाचे कंत्राट एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या केंद्राच्या कंपनीला देण्यात आल्याचा विरोध होत आहे़
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीच हे मत व्यक्त केल्यामुळे मरिन ड्राइव्हवरील पथदिवे तत्काळ बदलून जुनेच सोडियम व्हेपरचे दिवे लावण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांकडे केली आहे़
मुख्य न्या. मोहित शहा यांनी पदपथांवर सोडियम व्हेपरचे दिवे चांगले असल्याचे मत व्यक्त केले आहे.