वीस वर्षे, १०९४ मृत्यू, तरीही आम्हाला फरक पडत नाही

By अतुल कुलकर्णी | Updated: July 28, 2025 10:10 IST2025-07-28T10:08:33+5:302025-07-28T10:10:57+5:30

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पाण्याचा निचरा व्हायला दोन दिवस लागले. तोपर्यंत १०९४ लोकांचा मृत्यू झाला.

twenty years to 26 july 2005 incident 1094 deaths still we do not care | वीस वर्षे, १०९४ मृत्यू, तरीही आम्हाला फरक पडत नाही

वीस वर्षे, १०९४ मृत्यू, तरीही आम्हाला फरक पडत नाही

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पाण्याचा निचरा व्हायला दोन दिवस लागले. तोपर्यंत १०९४ लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार कायमचे उद्ध्वस्त झाले. या घटनेचा आमच्यावर कसलाही परिणाम झालेला दिसत नाही. त्यावेळी ९४४ मि.मी. पाऊस झाल्याचे कारण सांगितले गेले. मात्र, गेल्या दोन दिवसांत मुंबईत ५० ते ७० मिलिमीटर पाऊस  झाला आणि मुंबईकरांचे बेहाल झाले. मालाड, अंधेरी, दहिसर, कांदिवली, बोरिवली, वांद्रे, दादर टीटी, सायन, वडाळा, परळ, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, मुलुंड किती भागांची नावे घ्यायची? सर्वत्र पाणी साचले. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला. चार दिवसांच्या संततधारेने अख्खी मुंबई वेठीला धरली. महापालिकेचे दहा हजार कर्मचारी विविध भागांत तैनात आहेत, हा दिलासा वगळता लोकांचे हाल काही केल्या थांबत नाहीत. हातावर पोट असणाऱ्यांचे आणि सखल भागात राहणाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. 

२६ जुलैच्या महाप्रलयाला शनिवारी २० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर अनेक घोषणा झाल्या, अनेक सरकारे बदलली; मात्र  मुंबईत पाणी साचण्याची ठिकाणे आहे तीच राहिली. त्यात कसलीही सुधारणा झाली नाही. मुंबईत ४ मोठ्या, ४ लहान अशा ८ प्रमुख नद्या आहेत. याशिवाय काही ओढे आणि नालेही आहेत. ते पूर्वी नैसर्गिक पाण्याचे स्रोत होते; मात्र मुंबईतील बहुतांश नद्या आता नाल्यांमध्ये रूपांतरित झाल्या असून, त्यांचे नैसर्गिक अस्तित्व अतिक्रमण, प्लास्टिक, सांडपाणी यांमुळे धोक्यात आले आहे. 

मिठी नदीचा मार्ग संजय गांधी नॅशनल पार्क, अंधेरी, सांताक्रूझ, धारावी, महालक्ष्मी असा होता. त्याला आता अत्यंत प्रदूषित अशा गटाराचे स्वरूप आले आहे. अतिक्रमण आणि औद्योगिक घरगुती सांडपाण्यामुळे या नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वर्ष २००५ मधील त्या महापुराला हीच परिस्थिती कारणीभूत होती; मात्र वीस वर्षे झाली तरी आम्ही त्यातून कसलाही धडा घेतलेला नाही. उलट मिठी नदी आता कागदावरच उरली आहे. 
दहिसर नदीचा उगम संजय गांधी नॅशनल पार्कमधून व्हायचा. दहिसर, बोरिवली, गोराई खाडी अशी जाणारी ही नदीदेखील किनाऱ्यावरील झोपडपट्ट्या व अतिक्रमणांमुळे नाल्यासारखी झाली आहे. पोईसर नदी कांदिवली-मालाड मार्गे जायची. तीही आता अनेक ठिकाणी भूमिगत नाल्यात रूपांतरित झाली आहे.

ओशिवरा नदी गोरेगाव-अंधेरी-जुहू या मार्गाने जात होती. त्या नदीचे आता मोठ्या नाल्यात व काही ठिकाणी गटारीत रूपांतर झाले आहे. अतिक्रमण आणि सांडपाण्यामुळे या नदीचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे संपुष्टात आले आहे. इतर लहान नद्या आणि    ठाण्यामध्ये मनोरी, कासारवडवली, वालधुनी, तुलसी नदी यांचा समावेश होता. मनोरी व इतरांची तुलनेने अजूनही बरी स्थिती आहे. कारण खारफुटीमध्ये त्यांचे अस्तित्व टिकलेले आहे.

ही झाली नद्यांची अवस्था. अख्ख्या मुंबईत फेरीवाल्यांनी सगळे फुटपाथ नष्ट केले. जागोजागी कचऱ्यांचे ढीग. या शहराला ओरबडून घेण्यापलीकडे कोणालाही या शहराविषयी कसलेही प्रेम उरलेले नाही. त्यामुळे हे शहर स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतही कधी पुढे येत नाही. यासाठी केवळ महापालिकेत काम करणाऱ्या प्रमुखांची इच्छाशक्ती महत्त्वाची नाही. राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती जोपर्यंत प्रबळ होत नाही तोपर्यंत यातून कधीही मार्ग निघणार नाही. झोपडपट्ट्या फुटपाथवर धंदे करणारे लोक आपल्या मतपेट्या नाहीत, हे ज्या दिवशी मुंबईतल्या राजकारण्यांना कळेल त्याच दिवशी मुंबईचा चेहरामोहरा बदलेल. 

गेल्या काही दिवसांत मुंबई उच्च न्यायालयाने  मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढले आहे. पालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता, आळशीपणा, बेफिकेरी या वृत्तीमुळे पालिकेच्या विरोधात अनेक याचिका येतात. या खटल्यांवर सरकारचा किती पैसा खर्च होतो? हा पैसा वाचवून  तो ठाणे, मुंबईच्या विकासासाठी खर्च केला तर ही शहरं चांगली होतील, असे उच्च न्यायालयाला वाटते. मात्र, दोन्ही महापालिकांना आणि इथल्या राज्यकर्त्यांना असे का वाटत नसावे?

१९६०-७० च्या दशकात सिंगापूर शहर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले होते. चरस, गांजा, अफू, हेरॉइन यांचे सेवन, तस्करी आणि व्यसनमुक्तीसाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने सिंगापूरचा समाज अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा होता; पण राजकीय इच्छाशक्ती, कठोर कायदे, पुनर्वसन आणि जनजागृतीच्या जोरावर सिंगापूरने ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. १९७० च्या दशकात सिंगापूर सरकारने झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली. १९७३ मध्ये ड्रग्स विरोधी कायदा लागू करण्यात आला. याअंतर्गत ठराविक प्रमाणापेक्षा जास्त अमली पदार्थ सापडल्यास थेट मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली. उदा. १५ ग्रॅम हेरॉइन किंवा ५०० ग्रॅम गांजा सापडल्यास मृत्युदंड अनिवार्य होता. या कायद्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण केली. ते सिंगापूर आमूलाग्र बदलले. शंभर टक्के कायद्याचे पालन करणारे शहर अशी त्याची ओळख झाली. एक छोटे बेट जर स्वतःमध्ये इतका बदल करू शकत असेल तर प्रगतशील महाराष्ट्रात मुंबईसारखे शहर का बदलत नाही? याचे उत्तर  सत्ताधारी विरोधक आणि प्रशासनाने एकत्रितपणे दिले पाहिजे.

 

Web Title: twenty years to 26 july 2005 incident 1094 deaths still we do not care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.