वीस वर्षांनी अबू सालेम दोषी
By Admin | Updated: February 17, 2015 01:54 IST2015-02-17T01:54:37+5:302015-02-17T01:54:37+5:30
गँगस्टर अबू सालेमसह तिघांना दोषी धरले़ जैन यांचा खून ७ मार्च १९९५ रोजी झाला़ पोर्तुगाल येथून हस्तगत केल्यानंतर सालेम दोषी आढळलेला मुंबईतला हा पहिलाच खटला आहे़

वीस वर्षांनी अबू सालेम दोषी
मुंबई : बहुचर्चित बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन खून प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सोमवारी गँगस्टर अबू सालेमसह तिघांना दोषी धरले़ जैन यांचा खून ७ मार्च १९९५ रोजी झाला़ पोर्तुगाल येथून हस्तगत केल्यानंतर सालेम दोषी आढळलेला मुंबईतला हा पहिलाच खटला आहे़
असे असले तरी कठोर शिक्षा न करण्याच्या अटीवर अबूचा ताबा भारताला मिळाला आहे़ त्यामुळे त्याला या खटल्यात किती वर्षांची शिक्षा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ याआधी हैदराबाद व भोपाळ येथे बनावट पासपोर्ट प्रकरणी सालेमला शिक्षा झाली आहे़
सालेमसह मेहंदी हसन शेख व वीरेंद्र या आरोपींना विशेष न्यायाधीश जी़ए़ सानप यांनी या खुनासाठी दोषी धरले आहे़ या आरोपींना किती वर्षांची शिक्षा ठोठवावी, यावर सरकारी पक्ष उद्या, मंगळवारी युक्तिवाद करणार असून त्यानंतर बचाव पक्ष याबाबत आपले म्हणणे सादर करेल़ अबूने जैनकडे खंडणी मागितली होती़ त्यानंतर त्यांच्यात वाद झाला़ खंडणी म्हणून अंधेरीत मिळालेले तीन फ्लॅट विकले गेले व त्याचे पैसे हवालामार्फत अबूला दुबई येथे मिळाले़ हे पैसे अबूला मिळाल्यावर जैनची जुहू येथील बंगल्याबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ (प्रतिनिधी)