सायनमध्ये शाळेजवळ रंगले वीस मिनिटांचे थरारनाट्य...
By Admin | Updated: January 11, 2015 01:25 IST2015-01-11T01:25:27+5:302015-01-11T01:25:27+5:30
वेळ दुपारी साडेबाराची... पोलीस नियंत्रण कक्षातील फोन खणखणला आणि सायन येथील साधना शाळेच्या बाहेरील परिसरात संंशयास्पद बॅग असल्याचे सांगण्यात आले.

सायनमध्ये शाळेजवळ रंगले वीस मिनिटांचे थरारनाट्य...
मुंबई : वेळ दुपारी साडेबाराची... पोलीस नियंत्रण कक्षातील फोन खणखणला आणि सायन येथील साधना शाळेच्या बाहेरील परिसरात संंशयास्पद बॅग असल्याचे सांगण्यात आले. काही काळातच सायन पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीसदेखील बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू आॅपरेशन सुरू झाले. बघता बघता बघ्यांंच्या गर्दीतही भर पडली. बॅगेत बॉम्ब तर नाही ना, या भीतीने उपस्थितांची गाळण उडाली. २० मिनिटे सुरू असलेल्या या रेस्क्यू आॅपरेशननंतर बॅगेत बॉम्बऐवजी इलेक्ट्रिशनचे साहित्य सापडले आणि साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
एकीकडे पाकिस्तान येथील पेशावर सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर शाळांंच्या सुरक्षेच्या बाबतीत मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. अशात शाळेच्या बाहेरील परिसरात आढळलेल्या संंशयित बॅगेच्या कॉलमुळे साऱ्यांंचीच पळापळ झाली. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून वेळीच घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉडने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. अखेर २० मिनिटांची दमछाक झाल्यानंतर संंशयित बॅगेत इलेक्ट्रिशनचे साहित्य सापडले. सायन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बॅग ताब्यात घेण्यात आली असून प्राथमिक तपासाअंती ही बॅग इलेक्ट्रिशनची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
माझगावातही बॉम्बची अफवा
शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माझगाव येथील नूरबाग नाका ते फझलानी हायस्कूलदरम्यानच्या रस्त्यामध्ये बॉम्बची अफवा पसरली. येथे रस्त्यालगत उभ्या केलेल्या दोन दुचाकीच्या मधल्या भागात दोन बेवारस प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दाखल झाले. पथकाच्या तपासानंतर बेवारस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मातीने भरलेले दोन बॉक्स आढळून आले. परंतु ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.